Thursday, June 10, 2010

बालपणीचा काळ सुखाचा...

'वाचाल तर वाचाल'. फार चांगली आणि अर्थपूर्ण म्हण आहे. आणि आज काल पालकांनी शब्दशः मनावर घेतलेली सुद्धा.
मुलांनी जास्त वाचाव म्हणूनच कदाचित आजकाल २ वर्षाच्या मुलांसाठी पण शाळा आहेत. गोड भाषेत 'नर्सरी' नाव दिलय इतकाच फरक.

परवाच बहिणीला फोन केला आणि विचारलं काय चालू आहे? उत्तर ऐकून गारच पडलो.
"अरे टेनु साठी शाळा बघतोय."
"अग आत्ताशी सव्वा वर्षाचा आहे न तो. शाळेला अजून वेळ आहे न ३ वर्ष."
"कसले ३ वर्ष? आजकाल २ वर्षापासूनच नर्सरी आहेत."
"अग पण त्याच वय आहे का शाळेत जायचं?"
"हो झालंय."
यावर मी काय बोलणार. माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहील. ते गोड बाळ दप्तराच ओझं घेऊन शाळेतून येतंय. थकलेलं शरीर, मलूल चेहरा, आणि घराचा अभ्यास कसा संपवायचा याची चिंता.

दुसरा किस्सा मित्राच्या घरी. त्याच्या मुलाला दुसरीच्या परीक्षेत कमी मार्क पडले म्हणून साहेब त्याला रागवत होते.
"दिवसभर नुसत खेळायला पाहिजे. अभ्यास नको अजिबात. आजपासून तुझे खेळण बंद. आणि तुझा अभ्यास मी घेणार."
बिचार ७ वर्षाच पोर ते. गपचूप मान खाली घालून ऐकत होत. खेळ बंद झाल्यापेक्षा उद्यापासून बाबा अभ्यास घेणार याची त्याला जास्त भीती वाटत होती.

असे बरेच आहेत. आपल्यापैकी बर्याच जणांच्या घरात थोड्या फार फरकाने अस होत असेल.

मला माझ बालपण सगळ नाही पण बर्यापैकी आठवत. फार खेळायचो. गल्लीत नुसता दंगा असायचा. शाळेत होतो तेव्हापण उचलणार नाही इतक जड दप्तर घेऊन जाव लागत नव्हत.

पण आज-कालच्या स्पर्धेच्या जगात सगळच बदलत चाललय. मुलं लहानपणापासूनच ABCD गिरवायला लागलीयेत. आपला मुलगा सगळ्यात हुशार झाला पाहिजे या हव्यासापोटी बर्याच पालकांनी मुलांचा रोबोट करून टाकलाय. 'तारे जमीन पर' मधील पालकाच वाक्य मला अशावेळी कायम आठवत, "बडा होकार क्या बनेगा ये? कमायेगा कैसे?" खरही आहे ते. आपल्याकडे शिक्षण पद्धती अशी नाही कि प्रत्येकाला त्याच्या आवडत्या विषयात शिक्षण घेता येईल.
असो त्या वादात मला जायचं नाही.

आजची पिढी खरतर खूप हुशार आहे. बर्याच गोष्टी नुसत बघून बघून शिकतात मुलं. मी सातवीत असताना कॉम्प्युटर वापरायला शिकलो. आणि दहावी पर्यंत ते नीट चालवायला शिकलो. पण आता तर ५-६ वर्षाची मुल पण नीट कॉम्प्युटर चालवतात. त्यांच्या डोक्यात कल्पना पण फार निराळ्या आणि छान असतात. माझ्या एका मित्राच्या मुलाला विचारलं,
"मोठा होऊन काय होणार रे?"
त्याच लगेच उत्तर तयार होत, "काका, मी भू-वैज्ञानिक होणार. पाणी, शेती यासाठी काहीतरी शोधून काढणार." १२ वर्षाच्या मुलासाठी असा विचार करण खरच फार मोठी गोष्ट आहे. पण त्यासाठी त्याला घरून किती support मिळेल कोण जाणे. कदाचित त्याचेपण वडील तारे जमीन पर सारखा विचार करतील. त्यालाही डॉक्टर किंवा इंजिनीअर केला जाईल. आणि बाकी सर्वांसारखा तो पण कोणत्यातरी IT कंपनी मध्ये बटन तुडवत बसेल.

हेच का होतं त्याच स्वप्न? हे करायचं होतं त्याला सगळ्यांसाठी?
मुलाला इंजिनीअर व्हायचं असेल तर आकाश पातळ एक करून सगळी माहिती गोळा करणारे पालक, त्याला काहीतरी वेगळ करायचं म्हटलं तर इतके उदासीन का?

जबरदस्ती अभ्यास करून त्याने नेहमीच्याच रस्त्याने जाव हा अट्टाहास का?
हे असेच चालू राहिले तर "बालपणीचा काळ सुखाचा" हे वाक्य नामशेष होऊन "बालपणीचा काळ दुःखाचा" व्हायला फार काळ लागणार नाही.
कदाचित हाच रोष मोठेपणी मुलांच्या पालकांशी तुसडेपणाच्या वागणुकीचा कारण  ठरत असेल.
"आम्ही आमच्या पालकांशी असे नव्हतो बोलत." असा आपल्याला बर्याच ठिकाणी ऐकायला मिळत. त्यापैकी किती जणांच्या पालकांनी त्यांच्यावर अशी शिक्षणाची जबरदस्ती केली होती?
माझ्या वडिलांवर आमच्या आजोबांची कोणतीही जबरदस्ती नव्हती.
"जे शिकायचं ते मन लाऊन शिक. पण शिक आणि मोठा हो. बाकी काहीही लागल तर ते मी देईन."
हेच माझ्याही बाबतीत होत.

मी शाळेत असताना आमच्या घरी वडिलांचा कडक नियम होता. रोज संध्याकाळी १.३०-२ तास खेळायला गेलच पाहिजे. अभ्यास थोडा कमी झाला तरी चालेल. आणि अभ्यासाच्या वेळेस दुसर काही चालणार नाही. बाबा स्वतः बसून माझा अभ्यास घ्यायचे. प्रत्येक गोष्ट सोप्या भाषेत, रोजच्या आयुष्यातले उदाहरण देऊन सांगायचे. समजत नाही तोपर्यंत परत परत समजावून सांगायचे.

आज आपण ही भूमिका का नाही घेऊ शकत?

आपल्याला आपल्या कामातून वेळ नाही? ज्यांच्यासाठी आपल्या जीवाची ईतकी धडपड त्यांच्यासाठीच ईतके निर्बंध?? मग आपल्या म्हातारपणी आपल्यावर त्यांनी निर्बंध लावले तर त्यात चूक ते काय?
'आपण त्यांचा बालपण हिरावून घेतलं, बदल्यात त्यांनी आपल म्हातारपण' यात गैर ते काय?

'मुल ही देवाघरची फुलं' राहिलीच नाहीयेत. ती फुलं कोमेजालीयेत.
शिक्षणाची उपजाऊ जमीन त्यांना मिळत नाहीये, शिक्षकाच्या ज्ञानच खत त्यांना मिळत नाहीये.
आणि सर्वात महत्वाच म्हणजे,
"कोणतही वादळ येउदे, तुला काहीही होऊ देणार नाही अस खंबीरपणाने सांगणारा पालकांचा वटवृक्षच उन्मळून पडलाय."

...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...

1 comment:

 1. छान लिहिले आहेस ..
  खरेच ह्या शिक्षणाच्या आयचा घो ...
  तू बोलतोय ते सगळे ह्या चित्रपटात मांडलेच आहे ...

  परवा एक काकू त्यांच्या लहान मुलीला संगत होत्या ...
  "निशू यु आर इन थर्ड standard , its very difficult , जरा serious हो अभ्यास कर असे काहीतरी .."
  अरे तिसरी अवघड आहे असे सांगतात ..बिचारीचे ENG /DOC होताना काय हलत होणार देवच जाणे ...

  ReplyDelete