Friday, August 27, 2010

अपेक्षा........

"मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती."
आपल्या दैनंदिन आयुष्यात बऱ्याचदा ऐकायला मिळणार हे वाक्य.
कधी वडील मुलाला, कधी भाऊ बहिणीला, कधी आजोबा नातवाला तर कधी मित्र दुसऱ्या मित्राला...
५ शब्द फक्त, पण एकदम जिव्हारी लागणारे.
बऱ्याचदा हे वाक्य एखाद  नात  तोडायलाही पुरेस  असत.

दुखावलेल  मन जोडण  फार अवघड असत. पण या वाक्यामुळे दुखावलेल  मन जोडण मला तरी अशक्य वाटत. आपण  कितीही भरपाई करण्याचा प्रयत्न केला तरी जुन्या अपेक्षाभंगाच दुःख कुठेतरी कोपऱ्यात सलत असत. त्या एका चुकीसाठी आपण माफी नाकारतो. मग  तो आप्तेष्ट असो मित्र असो वा कोणीतरी तिसरी व्यक्ती असो.

जवळच्या माणसाकडून हे ऐकण्याची वेळ कोणावरही का यावी?
कारण  सोप्पं आहे. महत्वाच्या काळात चूक  झाली तर हे ऐकायला मिळणारच.

पण समोरच्याने जे काही केल ते चूकच आहे हे आपण कसं ठरवणार? तुमच्या मनासारख  जर एखादी व्यक्ती नाही वागली तर ती चुकीची वागते आहे (इति वपू) हे साधं सरळ गणित आपण मांडतो.
पण समोरच्याने कसं वागावं हे ठरवणारे आपण कोण? आप्तेष्ट, हितचिंतक, मित्र किंवा अजून कोणीतरी जवळचे म्हणून आम्ही सांगतो तसं त्याने वागावं. का? त्याला स्वतःच असा काही विचार नाहीये का? स्वतःच असं काही आयुष्य नाहीये का? स्वतःच असं स्वातंत्र्य नाहीये का? आपल्या मनाप्रमाणे आपला मित्र वागत नाही म्हटल्यावर त्याला दोष देण्यापेक्षा तो तसा का वागला याचा शोध किती जण  घेतात? त्या क्षणाची त्याची मनःस्थिती किती जण समजून घेतात? त्याला स्वतःची बाजू मांडण्याची संधी किती वेळा मिळते?
फारंच  कमी वेळा, आणि मग अपेक्षा भंग समोर येतो.
आणि बऱ्याच वर्षात  रोपट्यापासून वटवृक्षात  रुपांतर झालेलं नात्याचं झाडं क्षणात  उन्मळून  पडत.

मुळात आपण कोणाकडूनही अपेक्षा का करतो? नुकतीच ओळख झालेल्या मित्राला आपण हे कधीच ऐकवत नाही. कारण त्याच्याकडून आपल्याला काहीच अपेक्षा नसतात.

मैत्री हळू हळू वाढत जाते. जवळीक निर्माण होते. काही महत्वाच्या क्षणाला मैत्रीचा हात  सोबत मिळतो आणि मैत्री गाढ होत जाते.

नंतर विनंती ऐवजी हक्काने एखाद काम सांगितलं जात. आणि मित्रासाठी म्हणून ते केलाही जात. क्वचितच कधीतरी नकार येतो. आणि मग आपल्या मागण्या वाढत जातात.

कुठेतरी वाचण्यात आलेलं एक फार छान उदाहरण  आहे.
एखाद्या चिक्कार गर्दीच्या दिवशी बस च्या बाहेर उभ्या असलेल्या प्रत्येक माणसाला वाटत कि बस मध्ये कमीत कमी लटकून का होईना पण उभं राहण्याची जागा मिळावी. ती मिळाली तरी फार झाल. तशी जागा मिळाल्यावर थोड्याच वेळात माणसाचा कमीत कमी टेकू घेऊन उभं राहण्यासाठीच्या जागेचा शोध सुरु होतो. पुढची पायरी कुठेतरी जरा पुढेमागे करून बसायला मिळावं यासाठी जागेचा शोध सुरु होतो. नंतर व्यवस्थित बसायला मिळावं असं वाटायला लागत.
आणि ते मिळाल कि मग पूर्ण जागा रिकामी मिळावी जेणेकरून  नीट हात पाय  पसरून बसता येईल असं वाटायला लागत.
अश्या वेळेस जर कोणी विचारलं कि हि जागा मोकळी आहे का तर उगाच त्या माणसाचा राग येतो. दुसरीकडे पण जागा रिकामी आहे तिकडे जाऊन हा माणूस का बसत नाही असं वाटायला लागत.
आपण उभे असताना आपल्याला कोणीतरी टेकायला जागा दिली होती या गोष्टीचा साफ विसर पडतो. आणि आपण आपल्या आरामाचा विचार करतो.

कादाचित अपेक्षांच्या बाबतीतही असाच काहीस होत असावं. हळू हळू आपण त्या व्यक्तीच्या इतक्या जवळ जातो कि आपण त्याच  स्वतःच अस्तित्वच नाकारतो आणि त्या व्यक्तीचा पूर्ण वेळ आणि श्रम आपल्यासाठीच असावं असाही वाटायला लागत.

दुसरीकडे मोकळी जागा असूनही आपल्या शेजारी येऊन बसणाऱ्या माणसाचा आपल्याला जसा राग येतो तसाच काहीस मग आपल्यासाठी पूर्ण वेळ न देणाऱ्या मित्राबाबत वाटायला लागत.

आप्ल्याइतकच महत्वं असणारी दुसरी व्यक्ती असू शकते हे आपल्या मनाला पटतच नाही. आणि मग चुकांचा शोध सुरु होतो. ज्या चुका आधी दुर्लक्षित केलेल्या होत्या त्याच आता मोठ्या वाटायला लागतात. आणि सरतेशेवटी या सगळ्याचं रुपांतर "मला तुझ्याकडून हि अपेक्षा नव्ह्ती" यात होत.

बऱ्याचदा यात समोरच्याला तर कल्पनाही नसते कि नक्की इतक मोठ काय  झालं?
आणि मला महत्वं कमी दिल जातंय हे सांगायला आपण तयार नसतो. आपल्याला वाटत असत हे इतकं साधं त्याला कळायला नको? हे सांगायची गरजच का पडावी? इतक्या वर्षांच्या मैत्रीत याला इतकही कळू नये?

पण आपण समोरच्याच अस्तित्वच नाकारू पाहतोय हे आपल्याला कळत नसत.

हे जग आशेवर (किंवा अपेक्षांवर) चालते. पण खर बघितलं तर हे जग स्वार्थावर चालते. दुसऱ्याकडून अपेक्षा, दुसऱ्यावर आपण सांगत असलेला हक्क, दुसर्यानेच आपल्याला समजून घ्या हि  (छोटीशी?) मागणी या सगळ्यात स्वार्थच लपलेला असतो.

कधीतरी याच्या उलट विचार करून पाहावा.
दुसऱ्याकडून अपेक्षाच ठेवू नयेत. सगळ्यांच्या जवळ जावे पण अपेक्षा न ठेवता. स्वतःच्या अपेक्षा पुर्तीची वाट बघत बसण्यापेक्षा दुसर्यांचा थोडासा विचार करा.

आयुष्यातली ८०% दुःख अपेक्षा केल्यामुळे तयार होतात. आपण त्या त्रासाच मुळच नाहीसं केल तर?
पण आपल मन त्यातही समाधानी नसत. कोणावर तरी परोपकार केल्याची भावना मनात येते आणि पुन्हा त्याच्याकडून अपेक्षा निर्माण होतात. आणि हे चक्र असंच सुरु राहत, अखेरपर्यंत.

याला पर्याय मी तरी सांगू शकत नाही. कारण माणसाचा तो स्वभाव दोषच आहे. तो कसा दूर करायचा हा ज्याचा त्याने ठरवावा. दुसर्याने कसं वागून हा देश दूर करावा हे सांगून परत त्याने तसं वागाव हि अपेक्षा तयार होते. आणि तसं नाही झालं तर पुन्हा मनाची तगमग. पुन्हा अपेक्षाभंग.

मला स्वतःला हि अजून यातून बाहेर पडायचा मार्ग सापडला नाहीये. तोपर्यंत हा सगळा खटाटोप कोपऱ्यात सलत असलेल्या अश्याच  कोणत्यातरी अपेक्षाभंगाच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी...

...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...