Thursday, September 16, 2010

नाती..

"माझी अवस्था चेस बोर्डवरल्या घोडय़ासारखी झालीय. एक- दोन- अडीच बास..."
असा मित्राचा स्टेटस मेसेज  होता. तो वाचून मी त्याला सहजंच रिप्लाय केला,
"अरे मी तर प्याद्या सारखा झालोय. गरज असेल तेव्हा वजीर जिवंत करायला वापरायचा नाहीतर दुसऱ्या कोणालातरी वाचवायचं म्हणून बिनधास्त बळी देऊन टाकायचा."

खरतर तो रिप्लाय काहीतरी द्यायचा म्हणून दिला होता. पण नेहमीप्रमाणे उगाच त्यावर विचार करत बसलो.

बऱ्याच जणांचा स्टेटस मेसेज असतो, "Always use things and Love people, but in reality generally people do apposite."
कोणी लिहीलं आहे हे माहित नाही, पण आजच्या काळात एकदम समर्पक आहे. आपल्या फायद्यासाठी बरेच लोक गोष्टी आणि माणसे यात गोंधळ करून नको तेच करतात.

गरज असेपर्यंत माणसाची किंमत स्वतःच्या आयुष्याहूनही जास्त असते, आणि गरज संपल्यावर, ओळख दाखवणेही अवघड असते.
यालाच जुन्या लोकांनी 'कलयुग' नाव दिलय बहुतेक.

जगात माणसांवर प्रेम करा, हे जितक्या लोकांनी सांगितलाय तितका दुसरा कोणताही उपदेश  थोर लोकांनी आजपर्यंत केला नसेल. कितीतरी कविता, गाणी आणि लेख लिहिले गेलेत.

खरंच, माणसाला माणसासारख जगा हे सांगण इतक आवश्यक झालंय?

माणूस हा सगळ्या प्राण्यामधला सर्व श्रेष्ठ प्राणी. सगळ्यात प्रगत, सगळ्यात पुढे. आणि हे पद टिकवून ठेवण्यासाठी अनेक बदल माणसाने घडवून आणले. त्यानंतर काय?
म्हणून आता माणसातच पुढे राहण्याची शर्यत लागली.

आणि त्यासाठी मग नवे डावपेच. स्वार्थ, लबाडी, धूर्तपणा, फसवेगिरी हे सगळ नव्या रूपाने समोर येऊ लागलं. कारण आता प्रतिस्पर्धी सुद्धा माणूसच आहे.
आपलं सामर्थ्य दाखवण्यासाठी, ते तुझं, हे माझं; मी उच्च, तू नीच; मी श्रीमंत, तू गरीब; मी मोठा, तू लहान असे अनेक फरक केले जाऊ लागले.
जसा जसा काळ बदलत चालला आहे, तसे तसे हे फरक करणे जरी कमी होत असले तरी प्रत्येक गोष्टीसाठी शीत-युद्ध सुरूच असते.

आज काळ गोड बोलून काम काढून घेण्यात सगळे जन PHd घेऊ पाहतायेत.
'गरज सरो, वैद्य मारो' ही म्हण आपण पूर्णपणे सार्थकी लावण्याचा प्रयत्न करतोय. आज आपण प्रत्येक गोष्टीमागे 'आमचा फायदा काय?' हे शोधतो. का? एखादी गोष्ट आपण माणुसकीच्या नात्याने नाही करू शकत?
पण माणुसकी दाखवायला वेळ आणि पैसा खर्च करणे कोणालाच आज शक्य नाही.

आपले नातेवाईक निवडण आपल्या हाती नसत. पण कोणाशी किती संबंध चांगले ठेवावे हे आपल्या हाती जरूर असत. ज्याच्याकडून जास्त फायदा तो जवळचा, आणि ज्याला दर वेळेस आपल्यालाच पुढे होऊन मदत करावी लागेल तो लांबच असलेला बरा.
उद्या जवळच्या माणसाला मदत करावी लागली तर? तो हि कालांतराने लांब गेलेलाच बरा.

मित्रांच्या बाबतीत तर आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य असत. कोणाला मित्र करून घ्यायचं आणि कोणाला नावालाच म्हणून मित्र म्हणायचं ते पूर्णपणे आपणच ठरवतो.
मग कायम आपलं ऐकणारा, नेहमी मदत करणारा, आपल्या सगळ्या मागण्या मान्य करणारा आणि भविष्यात आपलं फायदा करून देऊ शकणारा आपला चांगला मित्र.
दुसऱ्या कोणाच्या बाबतीत ५० वेळा विचार करावा लागतो. ना जाणो उद्या आपल्याच अंगावर आला तर काय घ्या? त्यापेक्षा नावापुरताच मित्र ठेवलेला बरा.

कुठेतरी वाचण्यात आलं होत, 'माणसांसाठी रिलेशन असतात, रिलेशन साठी माणसे नाही..'
पण हे समजून घेण तर सोडाच, ते ऐकायलाही वेळ नाहीये कोणाकडे.

माणसांनी सख्या भावंडानाही   नाही सोडलं तर मित्राची काय कथा....

आजही बरीच वयस्कर मंडळी कायम म्हणतात, "आमच्या वेळेला हे असा नव्हत. सगळे लोक गुण्या गोविंदाने राहत होते. आता पुर्वीसारख राहिलेलं नाही. काळ बदलला."
मला प्रश्न पडतो, काळ बदलला म्हणजे नक्की काय झालं? दिवस उशिरा उगवायला लागला की रात्र लवकर व्हायला लागली की सूर्य पश्चिमेकडून उगवायला लागला?

बदलली ती माणस. बदल झालं तो माणसाच्या स्वभावात. एकत्रितपणे पुढे जाण्याच्या ऐवजी स्वतःचा फायदा प्रथम दिसू लागला.
आणि माणसे दुरावतच गेली.

आपल्याला लहानाचा मोठा करणाऱ्या आई वडिलांना त्यांच्याकडे देण्यासारख काही उरल नसेल तर वृद्धाश्रमात पाठवणारी मुलं, नातेवाईकांना  कामाशिवाय कधीही न विचारणारे नातेवाईक, मित्राला दूर सारणारा मित्र आणि अजून अश्या ईतर सगळ्यानी उद्या जर जग त्यांच्याशी असेच वागलं  तर कोणाकडेही तक्रार करू नये, फक्त आपला भूतकाळ आठवून पाहावा.....
सगळी उत्तरे आपोआपच मिळतील.

आणि कदाचित कळेल कि आपली मुले, मित्र, नातेवाईक हे सगळे आपणच दिलेली शिकवण पुढे चालू ठेवतायेत....

...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...

Friday, August 27, 2010

अपेक्षा........

"मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती."
आपल्या दैनंदिन आयुष्यात बऱ्याचदा ऐकायला मिळणार हे वाक्य.
कधी वडील मुलाला, कधी भाऊ बहिणीला, कधी आजोबा नातवाला तर कधी मित्र दुसऱ्या मित्राला...
५ शब्द फक्त, पण एकदम जिव्हारी लागणारे.
बऱ्याचदा हे वाक्य एखाद  नात  तोडायलाही पुरेस  असत.

दुखावलेल  मन जोडण  फार अवघड असत. पण या वाक्यामुळे दुखावलेल  मन जोडण मला तरी अशक्य वाटत. आपण  कितीही भरपाई करण्याचा प्रयत्न केला तरी जुन्या अपेक्षाभंगाच दुःख कुठेतरी कोपऱ्यात सलत असत. त्या एका चुकीसाठी आपण माफी नाकारतो. मग  तो आप्तेष्ट असो मित्र असो वा कोणीतरी तिसरी व्यक्ती असो.

जवळच्या माणसाकडून हे ऐकण्याची वेळ कोणावरही का यावी?
कारण  सोप्पं आहे. महत्वाच्या काळात चूक  झाली तर हे ऐकायला मिळणारच.

पण समोरच्याने जे काही केल ते चूकच आहे हे आपण कसं ठरवणार? तुमच्या मनासारख  जर एखादी व्यक्ती नाही वागली तर ती चुकीची वागते आहे (इति वपू) हे साधं सरळ गणित आपण मांडतो.
पण समोरच्याने कसं वागावं हे ठरवणारे आपण कोण? आप्तेष्ट, हितचिंतक, मित्र किंवा अजून कोणीतरी जवळचे म्हणून आम्ही सांगतो तसं त्याने वागावं. का? त्याला स्वतःच असा काही विचार नाहीये का? स्वतःच असं काही आयुष्य नाहीये का? स्वतःच असं स्वातंत्र्य नाहीये का? आपल्या मनाप्रमाणे आपला मित्र वागत नाही म्हटल्यावर त्याला दोष देण्यापेक्षा तो तसा का वागला याचा शोध किती जण  घेतात? त्या क्षणाची त्याची मनःस्थिती किती जण समजून घेतात? त्याला स्वतःची बाजू मांडण्याची संधी किती वेळा मिळते?
फारंच  कमी वेळा, आणि मग अपेक्षा भंग समोर येतो.
आणि बऱ्याच वर्षात  रोपट्यापासून वटवृक्षात  रुपांतर झालेलं नात्याचं झाडं क्षणात  उन्मळून  पडत.

मुळात आपण कोणाकडूनही अपेक्षा का करतो? नुकतीच ओळख झालेल्या मित्राला आपण हे कधीच ऐकवत नाही. कारण त्याच्याकडून आपल्याला काहीच अपेक्षा नसतात.

मैत्री हळू हळू वाढत जाते. जवळीक निर्माण होते. काही महत्वाच्या क्षणाला मैत्रीचा हात  सोबत मिळतो आणि मैत्री गाढ होत जाते.

नंतर विनंती ऐवजी हक्काने एखाद काम सांगितलं जात. आणि मित्रासाठी म्हणून ते केलाही जात. क्वचितच कधीतरी नकार येतो. आणि मग आपल्या मागण्या वाढत जातात.

कुठेतरी वाचण्यात आलेलं एक फार छान उदाहरण  आहे.
एखाद्या चिक्कार गर्दीच्या दिवशी बस च्या बाहेर उभ्या असलेल्या प्रत्येक माणसाला वाटत कि बस मध्ये कमीत कमी लटकून का होईना पण उभं राहण्याची जागा मिळावी. ती मिळाली तरी फार झाल. तशी जागा मिळाल्यावर थोड्याच वेळात माणसाचा कमीत कमी टेकू घेऊन उभं राहण्यासाठीच्या जागेचा शोध सुरु होतो. पुढची पायरी कुठेतरी जरा पुढेमागे करून बसायला मिळावं यासाठी जागेचा शोध सुरु होतो. नंतर व्यवस्थित बसायला मिळावं असं वाटायला लागत.
आणि ते मिळाल कि मग पूर्ण जागा रिकामी मिळावी जेणेकरून  नीट हात पाय  पसरून बसता येईल असं वाटायला लागत.
अश्या वेळेस जर कोणी विचारलं कि हि जागा मोकळी आहे का तर उगाच त्या माणसाचा राग येतो. दुसरीकडे पण जागा रिकामी आहे तिकडे जाऊन हा माणूस का बसत नाही असं वाटायला लागत.
आपण उभे असताना आपल्याला कोणीतरी टेकायला जागा दिली होती या गोष्टीचा साफ विसर पडतो. आणि आपण आपल्या आरामाचा विचार करतो.

कादाचित अपेक्षांच्या बाबतीतही असाच काहीस होत असावं. हळू हळू आपण त्या व्यक्तीच्या इतक्या जवळ जातो कि आपण त्याच  स्वतःच अस्तित्वच नाकारतो आणि त्या व्यक्तीचा पूर्ण वेळ आणि श्रम आपल्यासाठीच असावं असाही वाटायला लागत.

दुसरीकडे मोकळी जागा असूनही आपल्या शेजारी येऊन बसणाऱ्या माणसाचा आपल्याला जसा राग येतो तसाच काहीस मग आपल्यासाठी पूर्ण वेळ न देणाऱ्या मित्राबाबत वाटायला लागत.

आप्ल्याइतकच महत्वं असणारी दुसरी व्यक्ती असू शकते हे आपल्या मनाला पटतच नाही. आणि मग चुकांचा शोध सुरु होतो. ज्या चुका आधी दुर्लक्षित केलेल्या होत्या त्याच आता मोठ्या वाटायला लागतात. आणि सरतेशेवटी या सगळ्याचं रुपांतर "मला तुझ्याकडून हि अपेक्षा नव्ह्ती" यात होत.

बऱ्याचदा यात समोरच्याला तर कल्पनाही नसते कि नक्की इतक मोठ काय  झालं?
आणि मला महत्वं कमी दिल जातंय हे सांगायला आपण तयार नसतो. आपल्याला वाटत असत हे इतकं साधं त्याला कळायला नको? हे सांगायची गरजच का पडावी? इतक्या वर्षांच्या मैत्रीत याला इतकही कळू नये?

पण आपण समोरच्याच अस्तित्वच नाकारू पाहतोय हे आपल्याला कळत नसत.

हे जग आशेवर (किंवा अपेक्षांवर) चालते. पण खर बघितलं तर हे जग स्वार्थावर चालते. दुसऱ्याकडून अपेक्षा, दुसऱ्यावर आपण सांगत असलेला हक्क, दुसर्यानेच आपल्याला समजून घ्या हि  (छोटीशी?) मागणी या सगळ्यात स्वार्थच लपलेला असतो.

कधीतरी याच्या उलट विचार करून पाहावा.
दुसऱ्याकडून अपेक्षाच ठेवू नयेत. सगळ्यांच्या जवळ जावे पण अपेक्षा न ठेवता. स्वतःच्या अपेक्षा पुर्तीची वाट बघत बसण्यापेक्षा दुसर्यांचा थोडासा विचार करा.

आयुष्यातली ८०% दुःख अपेक्षा केल्यामुळे तयार होतात. आपण त्या त्रासाच मुळच नाहीसं केल तर?
पण आपल मन त्यातही समाधानी नसत. कोणावर तरी परोपकार केल्याची भावना मनात येते आणि पुन्हा त्याच्याकडून अपेक्षा निर्माण होतात. आणि हे चक्र असंच सुरु राहत, अखेरपर्यंत.

याला पर्याय मी तरी सांगू शकत नाही. कारण माणसाचा तो स्वभाव दोषच आहे. तो कसा दूर करायचा हा ज्याचा त्याने ठरवावा. दुसर्याने कसं वागून हा देश दूर करावा हे सांगून परत त्याने तसं वागाव हि अपेक्षा तयार होते. आणि तसं नाही झालं तर पुन्हा मनाची तगमग. पुन्हा अपेक्षाभंग.

मला स्वतःला हि अजून यातून बाहेर पडायचा मार्ग सापडला नाहीये. तोपर्यंत हा सगळा खटाटोप कोपऱ्यात सलत असलेल्या अश्याच  कोणत्यातरी अपेक्षाभंगाच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी...

...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...

Tuesday, July 20, 2010

मराठी पाउल पडते पुढे....

मे महिन्यात महाराष्ट्राने सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले. संयुक्त महाराष्ट्राला ५० वर्षे झाली. महाराष्ट्रासाठी फार महत्वाचा दिवस होता १ मे २०१०.
सगळीकडेच महाराष्ट्राने केलेली प्रगती, सुधारणा आणि अजून बऱ्याच चांगल्या गोष्टींची माहिती वाचायला मिळत होती.
दर महिन्याला महाराष्ट्र सरकार तर्फे एक मासिक काढण्यात येतं. त्यात संयुक्त महाराष्ट्राचा लढा, त्यातील सगळ्या लोकांचा सहभाग, विविध खेत्रातील लोकांनी केलेली कामगिरी अशी सगळी माहिती होती.

हे सगळं वाचताना फार आनंद झाला. आपण या भूमीत जन्माला आल्याचा अभिमान वाटला.
मनात विचार सुरु झाला. अजून आपण काय काय काय शकतो, महाराष्ट्राला अजून पुढे कसं जाता येईल?

आणि एकापुढे एक समस्या दिसत गेल्या. आणि समस्या गंभीर होत्या.
आज आपल्याकडे पुरेशी वीज नाही, पिण्यासाठी-शेतीसाठी पुरेसे पाणी नाही, शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी आपल्याकडे उत्तर नाही, दर वर्षी पदवी उत्तीर्ण होणाऱ्या मुलाच्या संख्येइतक्या नोकऱ्या नाहीत, आणि अजून बरेच काही.

माझ्या आधीच्या लेखात मे म्हटले आहे, प्रत्येक सुधारणेसाठी वेळ लागतो. पण ५० वर्षे हा वेळ फार जास्त आहे. ५० वर्षात आपण आपल्या गरजांसाठी पर्याय शोधू नाही शकत?

आपल्यात ती क्षमता नाही असे तर मुळीच नाही. क्षमता आहे म्हणून आज आपण इथे उभे आहोत.
संत ज्ञानेश्वर, शिवाजी महाराज यांसारख्या अनेक मोठ्या व्यक्तींनी महाराष्ट्राला घडवलं आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मुंबई, पुणे अग्रेसर आहेत, गावं तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एस. टी. महाराष्ट्रात आहे, भारताची आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्रात आहे, भारताच्या एकूण उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा भरपूर आहे.

तरीपण आपण अजून बरीच प्रगती करू शकलो असतो असे मला वाटते. पण त्याला लागणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राजकीय इच्छाशक्ती आपल्याकडे नाही.

गेली कित्येक वर्षे निवडणुका पाणी, महागाई, रस्ते आणि वीज याच मुद्यांवर लढवल्या जातात. ५० वर्षात हे मुद्द्यांचा निकाल का लागत नाही?
सगळ्यात सोप्पा कारण, 'जर हे मुद्देच संपले तर मग निवडणुका लढवायच्या कश्याच्या जोरावर? विरोधी पक्षाला कमी लेखायचं कोणत्या मुद्यावर? आणि त्याहूनही महत्वाचं हे काम करायची जबाबदारी टाकायची कोणाच्या डोक्यावर?'
काम करायला कोणीच तयार नाही. सगळ्यांना फक्त या योजनातून येणाऱ्या पैश्यातून आपला हिस्सा कसा काढायचा ह्याचीच चिंता आहे.

"आम्ही जनतेसाठी बराच काही करू इच्छितो. या निवडणुकीत आम्हाला निवडून द्या. सत्ता आमच्याकडे आली की कोणालाही कसलीही उणीव भासणार नाही."
मला एक काळात नाही जनतेसाठी काम करायला सत्तेत का असावं लागतं? विनाकारण पैशाची जी उधळण सगळेजण करतात ते पैसे जनतेसाठी वापरत का नाही?

एखाद्या नेत्याचा वाढदिवस असेल तर पूर्ण महाराष्ट्र भर अभिनंदनाचे फलक लागतात. लाखो रुपये खर्च केले जातात. ते पैसे जनतेसाठी का नाही वापरत? महापालिकेने रस्ता दुरुस्त नाही केला तर तिथे सत्यनारायणाची पूजा मांडण्यापेक्षा हे पैसे वापरून रस्ता दुरुस्त करावा. जनतेची सेवा करायची आहे तर मग हे का सुचत नाही.

सगळे बडे नेते दर वेळेस एखाद्या गरीब कुटुंबाला भेट देतात. त्यांच्यासोबत त्यांच काम करतात. कोणी VIP ऐवजी सध्या डब्यातून प्रवास करतात. पण आजपर्यंत एकही नेत्याने कधी म्हटलं नाही, 'माझ्या वाढदिवसाचे फलक लावण्यापेक्षा तो पैसा जनतेसाठी वापरा.' जर तुम्ही लोकांचे आवडते असाल तर लोक तुमचा वाढदिवस लक्षात ठेवतीलच. त्यासाठी जाहिरात का?

असे फलक लावून फक्त हेच सिद्ध होत कि तुमचा नेता जनतेमध्ये फार प्रिया नाही आणि म्हणूनच तुम्हाला त्यांची जाहिरात करून त्यांना लोकांपर्यंत पोहोचवाव लागतंय.
महात्मा गांधी, अब्दुल कलाम अश्या मोठ्या व्यक्तींनी कुठे फलक लावलेले सांगणारा आपल्याला भेटणार नाही. पण तरीही देशभरात लोक त्यांची पूजा करतात. कारण एकाच होता कि त्यांनी काम केलं. आजकाल काम होत नाही म्हणून जाहिरात.

असो विषयांतर होत जातंय.
महाराष्ट्राला अजून पुढे नेणं हि प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाची जबाबदारी आहे. कर्तव्य आहे. मग तो सामान्य माणूस असो किंवा कुणी मोठी व्यक्ती. पण दुर्दैवाने आज आपण फक्त हक्कांबाबत बोलतो. कर्तव्यांबाबत कधीच नाही.
ठरवलं तर सामान्य माणूस काहीही करू शकतो. हे ५ जुलै च्या बंद ने सिद्ध करून दाखवलं. मग असाच काहीतरी या इच्छा शक्ती गमावून बसलेल्या राजकीय शक्तींविरुद्ध का करू नये? मतदानात सगळ्याच पक्षांना बाद का ठरवू नये?

पण हे करायला पण इच्छा शक्ती हवी आहे. आणि ती आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे नाही. त्यासाठी त्यांना दोष देत नाही. कारण सामान्य माणसाला पहिले घराचा विचार करावा लागतो, आपल्या भविष्याचा विचार करावा लागतो, मुलांचा विचार करावा लागतो. आणि या सगळ्या ओढाताणीतच दिवस संपून जातो.

आपण सध्याच्या परीस्थित खुश आहोत. महाराष्ट्र इतर राज्यांशी तुलना करता बऱ्याच गोष्टीत पहिल्या ५ मध्ये आहे.
आपल्या इथे रोजगार, दळणवळण, ओद्योगिक विकास, शेती यासाठी बऱ्याच सुविधा आहेत. आणि राज्य प्रगतीपथावर आहे. या आश्वासनांवरच आपण समाधानी आहोत. आपण इतर बऱ्याच जणांपेक्षा चांगले आहोत.

पण आपल्यापेक्षाही इतर काही जण अजून चांगले आहे आणि आपल्या बऱ्याच पुढे आहेत याकडे आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो.
तुलना करायची तर आपल्यापेक्षा पुढे असलेल्याशी करावी. त्याच्यासारखं कसं होता येईल हा विचार करावा. पण मग त्यासाठी परत कष्ट कोण घेणार?
सरकार? सामान्य जनता? समाज सुधारक?

यापैकी कोणीच तयार होत नाही.
'प्रयत्नांती परमेश्वर' म्हणण्या पेक्षा आपण सगळेच 'असेल हरी तर देईल खाटल्यावरी' चा जप करतोय.
आपणच इच्छा शक्ती गमावून बसलोय तर मग इतरांना काय दोष द्यायचा.
आपण काय करायचं हे मी सांगणार नाही, पण प्रत्येकांनी करायचं ठरवलं तर मार्ग आपोआपच सापडेल.

'शिवाजी जन्मावा, पण शेजारच्याच्या घरात' हि म्हण रूढ झाली यातच सगळ काही आलं....

...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...

Tuesday, June 29, 2010

प्रवासाची वाटचाल...

काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रामध्ये बातमी होती. 'एस. टी. आपला चेहरा बदलणार.'
अश्या बातम्या या आधी बऱ्याचदा वाचण्यात आल्या. पण एस. टी. काही सुधारत नाही.
अजूनही बऱ्याच गावातील बस थांबे तितके चांगले नाहीत. तिथे गाड्या थांबत नाही. सगळ्यात महत्वाचं, अजूनही वाहक नीट वागत नाहीत. काही चालक गाड्या रेस कार असल्यासारखे चालवतात. काही गाड्या चांगल्या अवस्थेत नाहीत.
लोकांना सगळ्यात जास्त राग असेल तो एस. टी. वाहकाचा.
"तिकडे जागा आहे. तिकडे जाऊन बसा." जर तुम्ही वाहकाच्या बाजूला जाऊन बसलात तर हे वाक्य कायम ऐकायला मिळतं. 
"गाडी तिथे थांबत नाही." अस उर्मट उत्तर पण ऐकायला मिळत.
"समोर पाटीलावली आहे, ती वाचा की जरा जाऊन. दिसत नाही का? कशासाठी लावली आहे?" असा अपमानकारक उत्तर पण बऱ्याचदा ऐकायला मिळतं. 
जी अवस्था एस. टी. ची तीच रेल्वे ची. गाड्या कायम उशिराने चालणे, आरक्षणासाठी मोठी रांग असणे, खिडकीतल्या माणसाने नीट न बोलणे, गाड्यांचे अपघात होणे, डब्यात स्वच्छता नसणे आणि अजून बरच काही.
अशीच यादी करत गेलो तर ब्लॉग असाच भरून जाईल.
आणि याची अजून माहिती सांगणारे बरेच लेख, ब्लॉग वाचायला मिळतील. कोणत्याही माणसाला विचारलं तर यात असणारे सगळे त्रास ऐकायला मिळतील.
आणि हे सगळं खरंपण आहे. पण यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे की, अस आता कितीवेळा होत?
बऱ्याचदा होतं. पण आता या दोन्ही मंडळांचा व्याप लक्षात घेतला तर १०० पैकी किती वेळा असा अनुभव येतो? कदाचित १० वेळा, १५ वेळा. आणि हीच गोष्ट आपण बघत नाही.
मागे झालेल्या ज्ञानेश्वरी इक्सप्रेस च्या अपघातानंतर एक ब्लॉग वाचला. त्यात रेल्वेच्या नावाने भरपूर लोकांनी बोटे मोडली. आरक्षण दलाल कडून घेतल्याने अपघात झालेल्यांची नावे कळत नाही. त्यांच्या नातेवाईकांना मदत मिळत नाही. रेल्वे ने आरक्षण पद्धतीत सुधारणा करायला हवी. आणि बरेच काही. पण एकंदरी सगळा दोष रेल्वे ला देण्यात आला होता.
अपघात रेल्वेच्या चुकीमुळे झाला हे मान्य, पण रेल्वेच तिकीट योग्य माणसाकडून न घेण यात चूक कोणाची? केवळ काही पैसे वाचतात किंवा त्रास वाचतो म्हणून दुसऱ्याकडून तिकीट घेणं ही चूक कोणाची?
मी लहान असताना रेल्वेचं तिकीट फक्त तिकीट खिडकीतच मिळत असे. आणि त्या वेळेस तर दलाल फारच जास्त होते. कारण आधीच भरपूर तिकीट काढणं शक्य होत. 
पण आता पद्धत बरीच बदलली आहे. तुम्ही तिकीट घरी बसून इंटरनेट वापरून काढू शकता. रेल्वे अधिकृत एजंट नेमून दिले आहेत त्यांच्याकडून तिकीट काढू शकता. आणि तेही नाही जमलं तर तिकीट खिडकी कायम चालू असते.
आज ९०% गाड्या वेळेवर धावतात. जरी धावणारा गाड्यांची संख्या वाढली असली तरी अपघातांचा प्रमाण कमी झालं आहे. पूर्वी प्रत्येक महिन्यात अपघाताची बातमी असायची. पण आता ते कमी झालं आहे. कोणत्याही गाडीच वेळापत्रक तुम्ही घर बसल्या पाहू शकता. कोणत्याही गाडीतल्या आरक्षणाची स्थिती लगेच कळते. त्याहीपेक्षा कोणत्याही धावणाऱ्या गाडीची त्या क्षणाची स्थिती सुद्धा कळते. गाडी वेळेवर आहे की उशिरा आहे. उशिरा असेल तर किती उशिरा आहे. सध्या कोणत्या स्थानकाच्या पुढे गेली आहे. आणि अजून काही.
रेल्वे आशिया खंडातील सगळ्यात मोठी संस्था आहे. सगळ्यात जास्त नोकऱ्या रेल्वे ने उपलब्ध करून दिल्या आहेत. लोकांना आराम मिळावा म्हणून गाड्यांमध्ये बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या आहे. 'राजधानी', 'शताब्दी' सारख्या सुपर फास्ट आणि आरामदायक गाड्यांसोबत 'गरीब रथ' सारख्या सामान्यांना परवडणाऱ्या गाड्याही आहेत. निसर्गाचा अविस्मरणीय अनुभव देणारी 'कोकण रेल्वे' आहे. राजस्थान फिरवून आणणारी 'Palace on wheels' आहे.
मुंबई, भारताची आर्थिक राजधानी असलेल शहर तर 'लोकल' च्या जोरावर धावत आहे. मुंबई चा जणू कणाच तो.
पूर्वी अपघातानंतर २-३ दिवस बंद असलेले मार्ग आता काही तासात मोकळे केले जातात. मुंबईतील बॉम्ब स्फोटानंतर संध्याकाळी ७ वाजता बंद झालेली लोकल दुसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजता नव्या दमाने लोकांच्या सेवेसाठी हजर होती. दिवसभरात  दर १० मिनिटात एक लोकल सुटत असली तरी गाड्या केवळ काही मिनिटाच्याच उशिराने चालतात.
अशीच प्रगती एस. टी. ने पण केली आहे. आज एस. टी. च्या २१००० हून अधिक गाड्या आहेत. गाड्या फलाटावर लावण्या आधी आतून व बाहेरून स्वच्छ केल्या जातात. खराब गाड्यांची ताबडतोप दुरुस्ती केली जाते, किंवा बदलल्या जातात. अपघात लक्षणीय प्रमाणात कमी झाले आहेत. १० पैकी ९ वाहक आता चांगले वागतात. चालक पण खेडेगाव असेल तरी गाडी थांबवतात.
'लाल डब्बा'म्हणून कायम हिणवल्या जाणाऱ्या एस. टी. ने 'शिवनेरी' सारख्या गाड्याही सुरु केल्या आहेत. प्रत्येक स्थानकावर तक्रार पुस्तक असते. आणि त्यात लिहिलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जाते. (याचा अनुभव घेऊनच हे लिहितो आहे)
मी एकदा कल्याण हून नगरला येत होतो. रात्रीची वेळ होती. त्या रस्त्यावर लहान गावे बरीच आहेत. बऱ्याच छोट्या वस्त्याही आहेत. त्यामुळे तिथे उतरणारे पण होते. पण चालक आणि वाहकाने कोणताही आढा-वेढा न घेता प्रत्येक वस्तीवर गाडी थांबवली. एक काका तर बस फाट्यावर थांबत नाही म्हणून थोडा अलीकडेच उतरत होते. तर वाहकानेच त्यांना बसून राहायला सांगितला आणि त्यांच्या वस्तीच्या फाट्यावर सोडलं.
असे अनुभव बरेच आहेत. आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना आले असतील. पण ते सगळे फक्त त्या प्रवासापुरातेच असतात. बाहेर आल की परत फक्त चूकच दिसतात.
आपल्या मित्राच्या बऱ्याच चुका आपण त्याच्या एका चांगल्या कामासाठी सोडून देतो. पण इकडे परिस्थिती उलटी आहे. या दोन्ही मंडळांच्या एका चुकीसाठी आपण त्यांच्या बऱ्याच चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.
ही मंडळे परिपूर्ण नाहीत. उणीवा आहेत. पण त्या दूर करण्याचा प्रयत्नही केला जातोय हे नाकारता येणार नाही.
"प्रवाश्यांच्या सेवेसाठी" हे एकेकाळी नुसताच लिहायला म्हणून असलेल वाक्य खरा करण्याच प्रयत्न एस. टी. करतेय हे मान्य करायलाच हव.
प्रत्येक सुधारणा होण्यासाठी वेळ लागतो आणि तो वेळ आपण यांना दिलाच पाहिजे असा मला वाटत.

उन्हाळ्याच्या सुट्टी मामाच्या गावाला जायचं असो किंवा दिवाळीत आजोबांकडे जायचं असो;
राखी बांधायला बहिणीकडे जायचं असो किंवा नाताळच्या सुट्टीत फिरायला जायचं असो..

या संस्था कारण न देता आपल्या सेवेसाठी हजर असतात. नुसत्याच हजर नसतात तर या काळात जादा गाड्या  असतात. "हॉलिडे स्पेशल ट्रेन" असतात.

स्वतः आपल्या घरापासून दूर राहून हे कर्मचारी आपल्याला आपल्या नातेवाईकांकडे पोहोचवण्यास तयार असतात. स्वतः बसच्या बाकड्यावर झोपून, आपल्या मुलांना आजीच्या कुशीत गोष्ट ऐकत झोपण्यासाठी. स्वतः कॅन्टीन चा जेवण जेऊन घराबाहेर राहणाऱ्या मुलांना घरी नेतात आईच्या हातच जेवण्यासाठी, आपल्या घरापासून दूर राहतात प्रेयकर - प्रेयसीची भेट घालून देण्यासाठी..

कदाचित म्हणूनच या संस्था कित्येक दशके फक्त म्हणतात, "प्रवाश्यांच्या सेवेसाठी"

...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...

Saturday, June 12, 2010

चूक सामान्य माणसाचीच....

आज fwd मेल मध्ये २६-११ चा मेल आला.
"Which victory was important?" त्यात वर भारतीय क्रिकेट टीम एका २०-२० चा विश्वचषक जिंकून आली होती तेव्हाचा त्यांचा सत्कार, त्यांचे स्वागत असे काही फोटो होते. आणि खाली २६-११ ची लढाई संपल्यानंतर चे आपले जवान, त्यांचे काही फोटो होते. त्या फोटोत ते एका सध्या बेस्ट बस मध्ये बसलेले होते.
या बातमीने तेव्हापुरते छोटेसे वादळ उठवले आणि ते तितक्याच लवकर शांत पण झाले.

त्या घटनेनंतर जेव्हा परत 'ताज हॉटेल' आणि 'गेट वे ऑफ इंडिया' लोकांसाठी परत सुरु करण्यात आले त्यावेळी फार लोकांनी तिथे उस्फुर्तपणे हजेरी लावली. सगळ सगळ स्पष्टपणे आठवत होत.

"खरच कोणता विजय आवश्यक होता?" २०-२० चा कि २६-११ चा? एखादा लहान मुलगाही सांगेल कि २६-११ महत्वाच होत.
ग्राउंड वर खेळाडूंनी मारलेल्या निष्फळ उड्यापेक्षा जवानांनी गोळ्यांच्या वर्षावात मारलेल्या उड्या खरच महत्वाच्या होत्या. bat ने मारलेल्या ४-६ पेक्षा जवानांनी बंदुकीने आतंकवाद्याना मारणं निश्चितच जास्त महत्वाच होत.

त्या लढाईत जवानांनी दाखवलेल्या शौर्यासाठी त्यांना मिळालेली ती वागणूक खरच चुकीची होती. सरकारला मंत्र्यांसाठी लागेल तेव्हा लागेल ते साधन उपलब्ध करून देता येत. मग या सगळ्या जवानांसाठी एक चांगली बस का येऊ नये? एखादा खेळाडू काही जिंकून आला तर त्याचा जाहीर सत्कार होतो, मग कायम स्वतःच्या आयुष्यावर खेळणाऱ्या या खेळाडूंसाठी काहीच का नाही?

कोणत्याही किंमत नसलेल्या मुद्द्यावरून भांडणारे राजकीय पक्ष, त्यांनी यासाठी काय केल? कोणी स्वतः पुढे येऊन केली यांची सोय? कोणी दिली स्वतः ची गाडी या जवानांसाठी? कोणी मनापासून शहीद झालेल्यांना दिली श्रद्धांजली? नाही, उलट त्यांचीच जाहिरात करून पूर्ण महाराष्ट्रात ठीक ठिकाणी पक्षाची नाव झळकली.

एक prince विहिरीत पडला तर त्याचा आख्खं आयुष्याचा खर्च उचलायला तयार झालेले channel वाले आता कुठे गेले? कोणी केलं एखाद्या शहीद पोलिसाच्या घराला sponsar?
सगळ्यांचाच "बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात".

मला खरच या गोष्टीच फार वाईट वाटलं. पण त्यापेक्षा जास्त खेदाची बाब होती की "मी यासाठी काहीच केल नाही."
कोणीतरी एक मेल तयार केला आणि तो मेल आला कि Forward चा बटन दाबल. यापेक्षा जास्त काय झालं?
हळहळ व्यक्त केली, मित्रांसोबत या विषयावर नुसतीच चर्चा केली आणि संपल. जितका दोष सरकारचा तितकाच किंबहुना जास्तच दोष सामान्य जनतेचा. आणि त्यात मीही आलोच.

एक सामान्य माणूस काय करू शकला असता???

मला फोटोत बेस्ट बस च्या दारात बसलेल्या जवानाचा चेहरा आठवतो. एक समाधान होत त्या चेहऱ्यावर. काही वाईट लोकांना थांबवल्याच. काही निष्पाप प्राण वाचवल्याच.

आणि त्यासाठी त्या जवानांना किती जणांनी धन्यवाद दिले? काही निवडक लोकांनी, वार्ताहरांनी, आणि स्वहितासाठी जाहिरात करणाऱ्या राजकीय पक्षांनी. क्रिकेट टीमच्या स्वागतासाठी हजार असलेल्या लोकासंख्याच्या १% लोकही जवानांना धन्यवाद म्हणण्यासाठी हजर नव्हते. अभिनेत्यांच्या गळ्यात पडण्यासाठी आसुसलेले, क्रिकेट खेळाडूंच्या प्रेमात वेडे होऊन त्यांच्या मागे फिरणारे, त्यासाठी पोलिसांशी मारामारी करणारे लाखोंच्या संख्येने आहेत.

ती सगळी सामान्य माणसच आहेत ना? मग त्यापैकी किती सामान्य माणस इथे एक साधा धन्यवाद करायला आली?
रस्ता रोको करायला तयार असणारी किती लोक रस्त्यावर उतरली? उपोषणाला बसणाऱ्या नेत्यांना का नाही वाटल कि सरकारला यासाठी वेठीस धराव? गेट वे ऑफ इंडिया ला भरपूर जणांनी मेणबत्या लावून शहीदांना  आदरांजली दिली. त्यापैकी कितीजण तसेच तडक मंत्रालयावर गेले, कितींनी सरकारला यासाठी कोंडीत पकडलं?
news channel वर फालतू गप्पा मारून "आम्ही जनतेसाठी सगळ करतोय", "आम्हीही सामान्य माणूसच आहोत", "सरकारला याच उत्तर द्यावच लागेल" अश्या गर्जना कायम करणारे किती लोक पुढे आले?
कोणीच नाही.

एक सामान्य माणूस आपल्या आवडत्या star ला भेटण्यासाठी सगळे नियम तोडून जाऊ शकतो, पण तोच सामान्य माणूस कोणताही नियम न तोडता जवानांना भेटायला नाही जाऊ शकत. त्याला एक प्रेमाने मिठी मारून, "आज तू आमच रक्षण केलस" हे नाही म्हणू शकत.त्याला राखी बांधण्यासाठी एखादी बहिण पुढे नाही येऊ शकत. भावासाठी १० लोकांशी भांडणारा मोठा भाऊ पुढे नाही येऊ शकत.

का? कारण हे सामान्य माणसाच्या व्याख्येत बसत नाही.
स्वतःचा जीव सांभाळून दुरून सल्ले देणारी व्यक्ती म्हणजे सामान्य माणूस. 'शिवाजी जन्मावा पण शेजारच्याच्या घरात' हे म्हणणारी व्यक्ती सामान्य माणूस. पोकळ गर्जना करणारी व्यक्ती म्हणजे सामान्य माणूस. 'मी सामान्य माणूस आहे. मी काय करू शकतो?' असा म्हणून रडत बसणारी व्यक्ती म्हणजे सामान्य माणूस.

आणि म्हणूनच सरकारच्या अश्या चुकांसाठी कोणीच काही केलं नाही. कोणी स्वताहून मदत केली नाही.
केल तर फक्त एकाच, आलेल्या मेल ला FWD.


---------------------------------------------------------------------------------------------------------------
वरील लेखात कोणावरही व्यक्तिगत आरोप करण्याचा हेतू नाही. काही लोकांनी खरच अश्या वेळेस पुढे होऊन मदत केली. जे करणं आवश्यक होत ते सगळ कशाचीही परवा ना करता केल. त्या सगळ्यांना मनापासून सलाम. त्या सगळ्यांच्या सोबतीने मी काहीच नाही केलं या खेदातून लिहिलेला हा लेख. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही, पण तसे काही झाले असल्यास क्षमस्व.

...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...

Thursday, June 10, 2010

बालपणीचा काळ सुखाचा...

'वाचाल तर वाचाल'. फार चांगली आणि अर्थपूर्ण म्हण आहे. आणि आज काल पालकांनी शब्दशः मनावर घेतलेली सुद्धा.
मुलांनी जास्त वाचाव म्हणूनच कदाचित आजकाल २ वर्षाच्या मुलांसाठी पण शाळा आहेत. गोड भाषेत 'नर्सरी' नाव दिलय इतकाच फरक.

परवाच बहिणीला फोन केला आणि विचारलं काय चालू आहे? उत्तर ऐकून गारच पडलो.
"अरे टेनु साठी शाळा बघतोय."
"अग आत्ताशी सव्वा वर्षाचा आहे न तो. शाळेला अजून वेळ आहे न ३ वर्ष."
"कसले ३ वर्ष? आजकाल २ वर्षापासूनच नर्सरी आहेत."
"अग पण त्याच वय आहे का शाळेत जायचं?"
"हो झालंय."
यावर मी काय बोलणार. माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहील. ते गोड बाळ दप्तराच ओझं घेऊन शाळेतून येतंय. थकलेलं शरीर, मलूल चेहरा, आणि घराचा अभ्यास कसा संपवायचा याची चिंता.

दुसरा किस्सा मित्राच्या घरी. त्याच्या मुलाला दुसरीच्या परीक्षेत कमी मार्क पडले म्हणून साहेब त्याला रागवत होते.
"दिवसभर नुसत खेळायला पाहिजे. अभ्यास नको अजिबात. आजपासून तुझे खेळण बंद. आणि तुझा अभ्यास मी घेणार."
बिचार ७ वर्षाच पोर ते. गपचूप मान खाली घालून ऐकत होत. खेळ बंद झाल्यापेक्षा उद्यापासून बाबा अभ्यास घेणार याची त्याला जास्त भीती वाटत होती.

असे बरेच आहेत. आपल्यापैकी बर्याच जणांच्या घरात थोड्या फार फरकाने अस होत असेल.

मला माझ बालपण सगळ नाही पण बर्यापैकी आठवत. फार खेळायचो. गल्लीत नुसता दंगा असायचा. शाळेत होतो तेव्हापण उचलणार नाही इतक जड दप्तर घेऊन जाव लागत नव्हत.

पण आज-कालच्या स्पर्धेच्या जगात सगळच बदलत चाललय. मुलं लहानपणापासूनच ABCD गिरवायला लागलीयेत. आपला मुलगा सगळ्यात हुशार झाला पाहिजे या हव्यासापोटी बर्याच पालकांनी मुलांचा रोबोट करून टाकलाय. 'तारे जमीन पर' मधील पालकाच वाक्य मला अशावेळी कायम आठवत, "बडा होकार क्या बनेगा ये? कमायेगा कैसे?" खरही आहे ते. आपल्याकडे शिक्षण पद्धती अशी नाही कि प्रत्येकाला त्याच्या आवडत्या विषयात शिक्षण घेता येईल.
असो त्या वादात मला जायचं नाही.

आजची पिढी खरतर खूप हुशार आहे. बर्याच गोष्टी नुसत बघून बघून शिकतात मुलं. मी सातवीत असताना कॉम्प्युटर वापरायला शिकलो. आणि दहावी पर्यंत ते नीट चालवायला शिकलो. पण आता तर ५-६ वर्षाची मुल पण नीट कॉम्प्युटर चालवतात. त्यांच्या डोक्यात कल्पना पण फार निराळ्या आणि छान असतात. माझ्या एका मित्राच्या मुलाला विचारलं,
"मोठा होऊन काय होणार रे?"
त्याच लगेच उत्तर तयार होत, "काका, मी भू-वैज्ञानिक होणार. पाणी, शेती यासाठी काहीतरी शोधून काढणार." १२ वर्षाच्या मुलासाठी असा विचार करण खरच फार मोठी गोष्ट आहे. पण त्यासाठी त्याला घरून किती support मिळेल कोण जाणे. कदाचित त्याचेपण वडील तारे जमीन पर सारखा विचार करतील. त्यालाही डॉक्टर किंवा इंजिनीअर केला जाईल. आणि बाकी सर्वांसारखा तो पण कोणत्यातरी IT कंपनी मध्ये बटन तुडवत बसेल.

हेच का होतं त्याच स्वप्न? हे करायचं होतं त्याला सगळ्यांसाठी?
मुलाला इंजिनीअर व्हायचं असेल तर आकाश पातळ एक करून सगळी माहिती गोळा करणारे पालक, त्याला काहीतरी वेगळ करायचं म्हटलं तर इतके उदासीन का?

जबरदस्ती अभ्यास करून त्याने नेहमीच्याच रस्त्याने जाव हा अट्टाहास का?
हे असेच चालू राहिले तर "बालपणीचा काळ सुखाचा" हे वाक्य नामशेष होऊन "बालपणीचा काळ दुःखाचा" व्हायला फार काळ लागणार नाही.
कदाचित हाच रोष मोठेपणी मुलांच्या पालकांशी तुसडेपणाच्या वागणुकीचा कारण  ठरत असेल.
"आम्ही आमच्या पालकांशी असे नव्हतो बोलत." असा आपल्याला बर्याच ठिकाणी ऐकायला मिळत. त्यापैकी किती जणांच्या पालकांनी त्यांच्यावर अशी शिक्षणाची जबरदस्ती केली होती?
माझ्या वडिलांवर आमच्या आजोबांची कोणतीही जबरदस्ती नव्हती.
"जे शिकायचं ते मन लाऊन शिक. पण शिक आणि मोठा हो. बाकी काहीही लागल तर ते मी देईन."
हेच माझ्याही बाबतीत होत.

मी शाळेत असताना आमच्या घरी वडिलांचा कडक नियम होता. रोज संध्याकाळी १.३०-२ तास खेळायला गेलच पाहिजे. अभ्यास थोडा कमी झाला तरी चालेल. आणि अभ्यासाच्या वेळेस दुसर काही चालणार नाही. बाबा स्वतः बसून माझा अभ्यास घ्यायचे. प्रत्येक गोष्ट सोप्या भाषेत, रोजच्या आयुष्यातले उदाहरण देऊन सांगायचे. समजत नाही तोपर्यंत परत परत समजावून सांगायचे.

आज आपण ही भूमिका का नाही घेऊ शकत?

आपल्याला आपल्या कामातून वेळ नाही? ज्यांच्यासाठी आपल्या जीवाची ईतकी धडपड त्यांच्यासाठीच ईतके निर्बंध?? मग आपल्या म्हातारपणी आपल्यावर त्यांनी निर्बंध लावले तर त्यात चूक ते काय?
'आपण त्यांचा बालपण हिरावून घेतलं, बदल्यात त्यांनी आपल म्हातारपण' यात गैर ते काय?

'मुल ही देवाघरची फुलं' राहिलीच नाहीयेत. ती फुलं कोमेजालीयेत.
शिक्षणाची उपजाऊ जमीन त्यांना मिळत नाहीये, शिक्षकाच्या ज्ञानच खत त्यांना मिळत नाहीये.
आणि सर्वात महत्वाच म्हणजे,
"कोणतही वादळ येउदे, तुला काहीही होऊ देणार नाही अस खंबीरपणाने सांगणारा पालकांचा वटवृक्षच उन्मळून पडलाय."

...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...

Wednesday, June 2, 2010

तुम्हीच ठरवा....

परवा एका office मध्ये गेलो होतो. तिथे १ जुना मित्र भेटला. मला बघून हसला.
हाय हेल्लो करून परत जागेवर जाऊन बसला. खाली मान घालून परत कॉम्पुटर मध्ये बुडाला.
पण त्याच ते हसण, हाय हेल्लो पहिलेसारख नव्हत. त्याच्या हसण्यातले काहीतरी हरवलेले होते.
क्षणभर वाटल तेच काहीतरी तो कॉम्पुटर मध्ये शोधात असेल.

मी माझ काम करून घरी आलो. त्याचा चेहरा सारखा समोर येत होता.

जुने दिवस आठवून सहज कॉलेज मधले फोटो बघत बसलो.
जवळ जवळ सगळ्याच फोटोत तो होता. trip असो किंवा कॉलेज मधे gathering, एखादं competition असो किंवा वर्गात कोणाची खोडी काढायची असो. सगळीकडेच महाशय पुढे असणार.
आमच्या वर्गातल्या उत्साहाच्या नदीच उगमस्थान आणि समुद्र सगळ तोच.

त्याचं ते जुन version माझ्या मेमरी च्या archive मधून समोर आलं.
कितीतरी फरक पडला होता त्यात. का बदल झाला इतका??
विचार करत करत फोटो बघत होतो आणि convocation चे फोटो समोर आले.

placement चे दिवस आठवले. interview session आठवले.
आणि बदललेल्या आयुष्याची सुरुवात आठवली.

पहिल्यांदाच  सगळ्यांनी एकत्र येण्याच्या ऐवजी स्वतःचं selection व्हावं म्हणून प्रार्थना केल्याचं आठवल.
आयुष्याच्या race ची सुरुवात कदाचित तिथेच झाली. मित्रा ऐवजी स्वतःसाठी  प्रार्थना करण्याची सवय आयुष्याने तिथे लावली. मित्रांमध्ये मैत्री ऐवजी स्पर्धा सुरु झाली.

नव्या आयुष्यात सगळ काही सुरळीत होत. उलट जास्त मजा होती. नवीन ऑफिस, नवीन मित्र आणि सगळ काही नवीन. सुरुवातीचे काही महिने सगळं छान छान होत. ट्रेनिंग चालू होत, कामात काहीतरी नवीन शिकायला मिळत होत, रोज सगळ्यांच्या ऑफिस मधल्या गमती कळत होत्या, सगळ कस अगदी एखाद्या छान गोष्टी सारख होत.

पण हळू हळू काम वाढत गेलं, भेटण कमी झालं. email आणि messenger ने आमची भेट करून देण्याची जबाबदारी घेतली. आधी वाटायचं याला काय अर्थ आहे, पण नंतर ते बर वाटायला लागल.
मित्राच्या लाथ मारून उठवण्यापेक्षा messenger चा गुड मोर्निंग बरा वाटायला लागला. मित्राला मिठी मारण्यापेक्षा messenger चा smiley creative वाटायला लागला.

कामच प्रेशर वाढायला लागल तसं messenger चे hi-hello पण कमी झाले. आणि मग भेटल्यानंतर चे प्लान काय या पेक्षा भेटण्याचं planning कराव लागल. मला सुट्टी नाही, माझा boss येणार आहे, फार काम आहे, अश्या अनेक  कारणांनी भेटण पण जवळ जवळ बंदच झालं.

खरच इतक अशक्य होत का मित्रांना भेटण???

काही जण म्हणतील, "बाबा तुला माहित नाही माझा boss कसा आहे?" काही म्हणतील, "अरे माझ काम तू करून बघ मग कळेल तुला." आणि अजून बरच काही.

थोडा विचार केला, आणि वाटल कि कधी कधी मी पण अशीच काहीतरी कारण देतोच कि, प्रत्येकाचे कारण वेगळे असतील पण अशी कारण कोण मुद्दाम का देईल?? परिस्थितीच कारणीभूत असते.

क्षणभर वाटले कि मी स्वतःला समजावत होतो. पण नंतर कळल कि केलेल्या चुकांचं मी समर्थन करत होतो.
कॉलेज मध्ये असताना रात्र रात्र जागून काम केलं नव्हत??? थकून रूम वर आलो तरी मित्रासोबत बाहेर गेलो नव्हतो?? सेकण्ड हाल्फ ऑफ मिळाला तर लगेच फिरायला गेलो नव्हतो??? आणि अशी यादी वाढतच गेली.
पण तितक्यात माझ्यातल्या professional ने डोकं वर काढल. अरे बाबा तेव्हा tension नव्हत, आयुष्याची चिंता नव्हती, आता जॉब सांभाळावा लागतो. कशीतरी स्वतःची समजूत काढून मी परत फोटो बघायला लागलो.

जुन्या आठवणी जरा ताज्या कराव्या म्हणून जुने mail, chat वाचत बसलो.
एक fwd mail होता. Great Personality. आपले माजी राष्ट्रपती डॉ. A. P. J. अब्दुल कलाम यांच्या ऑफिसमधला किस्सा होता तो. त्यांचा junior कामात busy असतो म्हणून ते स्वतः त्याच्या junior च्या मुलांना फिरायला घेऊन जातात. क्षणात "अग्निपंख" परत वाचाल्यासारख वाटल.

त्यांना tensions कमी होती? कामाच pressure कमी होत??? किती तरी लोकांना उत्तर द्यायचं होत..
लोकांच्या किती अपेक्षा होत्या त्यांच्याकडून...
ते राष्ट्रपती असताना एकदा पुण्यात आले होते. पूर्ण दिवस काही न काही कार्यक्रम होते. त्यांच्या schedule मध्ये १ मिनिट पण जागा नव्हती. कर्वे रोड ची ट्राफिक बंद केली होती कारण त्यांची गाडी तिथून जाणार होती. मी तिथेच होतो. एकामागे एक भरधाव गाड्या जात होत्या. आणि अचानक statue म्हणाव तश्या सगळ्या गाड्या थांबल्या.
डॉ. कलाम गाडीतून खाली उतरले आणि तिथे उभ्या असलेल्या काही लहान मुलांशी हसून थोडा वेळ बोलले.

हि गोष्ट जवळपास सगळ्यांनाच माहित आहे कारण दुसर्या दिवशी पेपर ला मुख्य बातमी होती.

जर त्यांना त्यांच्या कामातून काही मिनिट काढता येतात तर मग माझ्या सारख्याला दिवसातला अर्धा तास का मिळू नये? हेच त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अजून बर्याच लोकांच्या बाबतीत बघता येईल. मग ते राष्ट्रपती भवन असो किंवा इस्रो असो किंवा साराभाई रिसर्च सेंटर असो. कामच tension घेण्यापेक्षा त्याला एन्जॉय का नाही करायचं?   त्यांना शक्य आहे तर मग मला का नाही?

त्यांना शक्य आहे, ते राष्ट्रपती होते, त्यांना कोणाला उत्तर द्यायचं नव्हत. थोडा उशीर झाला कुठे, तरी त्यांना बोलणार कोणी नव्हत.
का त्यांना देशाच्या १०० कोटी लोकांना उत्तर द्यायचं नव्हत? देशाचे पहिले नागरिक म्हणून त्यांचा हे कर्तव्य ते करत नव्हते?

आणि मग याच वाद-प्रतिवादात मी बराच वेळ घालवला. आणि शेवटी उत्तर ठरलेलंच होत.
मी माझ्या चुकांचं समर्थन करण चूकच आहे. वेळ काढला तर सगळ्यांकडेच असतो. तो काढायची फक्त इच्छा हवी असते.

सगळेच जण मोठ्या कंपनी मध्ये काम करतात. सगळ्यांचाच ऑफिस ७ पर्यंत सुटत. मग सगळे मित्र मिळून अर्धा तास भेटू नाही शकत??
परत थोडा वेळ सगळ्या चिंता बाजूला ठेवून थोडी मजा करावी. एखादी मुलगी दिसली तर मित्राला म्हणाव "खाली उतर मी तिला घेऊन जातो.", त्यानेही म्हणाव "तुला जर कानाखाली बसली तर मी तुला ओळखत नाही"
पुन्हा एकमेकांची थोडीशी खेचावी.

रोज नाही जमणार कदाचित, घरचे वाट बघत असतात मुलांना फिरायला घेऊन जायचं असत, पण आठवड्यातून २ दिवस का जमू नये? महिन्यातून एखादा रविवार ट्रीप का जमू नये?

कॉलेजला असताना couples ना बघून मनात विचार यायचा आपण अस मुलीला मागे बसवून केव्हा फिरणार? आता हक्काची बायको आहे तर तिला फिरवायला वेळ का मिळू नये?

हे सगळ लिहित असतानाच माझ्या एक मित्राने त्याला सांगितलेला किस्सा:
मित्राच्या ऑफिस मधला एक मुलगा मित्राला संगत होता ...
त्याचे जिजाजी २ वर्षे OUT OF इंडिया होते. तर त्याच्या भाच्याच्या admission कार्ड , result कार्ड ह्यावर तोच सही करायचा. आता जिजाजी परत आले आहेत पण मुलांच्या सवयी जुन्याच. ते सगळे मामालाच सांगतात, बापाशी फार कमी बोलतात. मामला सांगावे लागते. तुम्ही पप्पाकडे जा.
तो बाप हे सगळ कोणासाठी करत होता? मुलांसाठीच ना? मग अशी परिस्थिती का आली? का मुलांना बाबापेक्षा मामा जवळचा का झाला?? मामाच्या गावाला जाऊया हे ऐकण्याऐवजी  बाबांच्या गावाला जाऊया हे का ऐकाव लागल???

हे असे प्रश्न बरेच आहेत आणि त्यांच्यापासून पळायचं असेल तर कारण हि बरीच आहेत.

पण मी ठरवलंय आता कारण बंद करायची आणि वेळ काढायचा. ते दिवस परत आणायचेच. त्रास होईल कदाचित, काम आणि घर सांभाळून बाहेर पडायला. पण यातून मिळणारा आनंद त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल. कदाचित माझ आयुष्य अजून बदलेल. पण एक नक्की तो बदल चांगलाच असेल.

priority तुम्ही ठरवा ...
वैयक्तिक आयुष्य, तुमची मित्र, कुटुंब, बायको पोरे कि ऑफिस.....
निवड तुमची आहे.
आयुष्य हसत जगायचं कि आपल्या "Sad Demise" चा mail ऑफिस मध्ये फिरवायचा.....

...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...

Tuesday, June 1, 2010

सुशिक्षित काका

".... साल्यांना पगार काय झक मारायला देतात का? तुम्हाला तुमचा पगार पुरत नाही म्हणून आमचा खायचा का?? आमच्याकडे पैशाच झाड आहे का??"
मित्र तावातावातच घरात आला. तो ५ मिनिट अशीच तनतन करत होता.
त्याला थंड पाणी दिलं, a/c समोर बसवलं. जरा वेळाने त्याचा डोकं शांत झालं.

याच कोणत्यातरी government च्या ऑफिसमध्ये कधीतरी काम पडायचं. सवयी प्रमाणे तिथे वजन पडल्याशिवाय काम होता नाही. आणि आमच्या साहेबाना वजन ठेवणच नेमकी जमत नाही.

"अरे नुसती एक सही करायची आहे त्याला. ५ दिवस झालेत चकरा मारतोय. सगळे कागदपत्र मी जमा केले आहेत. त्याच्यावर शिक्के पण बसलेत. आता domicile वर एक शेवटची सही करायला त्याला वेळ नाहीये. दिवसभर ऑफिस मध्ये नुसता ढिम्म सारखा बसून असतो @#$@#" आणि पुढे बरच काही....

त्याला काहीही समजावण्यात त्यावेळी अर्थ नव्हता. मी शांतपणे कागदपत्र घेतले आणि दुसर्या दिवशी त्या ऑफिसमध्ये गेलो. माझे बाबा सरकारी कर्मचारी होते. त्यांच्यामुळे सरकारी कार्यालयातले काही लोक माझ्या ओळखीचे होते. म्हटलं बघाव इथे कोणी ओळखीचे दिसतंय का? तितकेच जरा ५० रुपये कमी लागतील हा विचार.

तितक्यातच एक वयस्कर शिपाई काका स्वतःहूनच स्मितहास्य करत माझ्याकडे आले. 'वाह सकाळी सकाळी एक बकरा मिळाला' या खुशीतच आले असणार.
त्यांनी एकदम चांगली ओळख असल्यासारखीच सुरुवात केली.
"काय साहेब आज इकडे कस काय?"
हे मला अनपेक्षित होत. मी ओळखलं नसल्याचे भाव कसतरी लपवत म्हणालो, "काही नाही हो काका, थोडसं काम होत."
government च्या ऑफिसमध्ये लोक काम असताना जाण्याच टाळतात, मग काम नसताना कोण कशाला मरायला  ऑफिस मध्ये जाईल?? त्यांनी माझी विकेट गेल्याच ओळखल आणि म्हणाले, "अहो तेच, काय काम काढलत?"
"मित्राच  domicile certificate हवं होत."
"कागदपत्र आणलियेत?"
"हो सगळी आहेत. सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यात. आता फक्त domicile वर सही हवी आहे."
"द्या इकड ते. साहेब दुपारी येतील. मी घेतो त्यांची सही. संध्याकाळी येऊन घेऊन जा certificate."
"धन्यवाद काका."
सवयी प्रमाणे खिशातून ५० ची नोट काढून दिली.
"अहो पैसे कशाचे साहेब?"
आता या प्रश्नाला काय उत्तर दयावं?? (तुम्हाला कोणाला सुचलं तर मला सांगा)
"पैसे नको. तुम्ही संध्याकाळी या. तुमच काम करून ठेवतो." अस म्हणत त्यांनी पैसे परत माझ्या खिशात टाकले आणि निघून गेले.

हे म्हणजे नरकात जाऊन रंभेचा डान्स बघायला मिळण्यासारख होत.
नंतर आठवल माझ्या domicile च्या वेळेस बाबांसोबत आलो असताना यांनीच माझा काम केला होता (पैसे न घेता). एक साधा सरळ आणि चांगल्या मनाचा माणूस म्हणून बाबांनी ओळख करून दिली होती. (माझा दुर्दैव कि इतक्या चांगल्या माणसाची ओळख मी विसरलो होतो.)

संध्याकाळी मी ५.३० च्या सुमारास गेलो तर काका जसे माझी वाटच बघत होते. लगेच त्यांनी मला certificate आणून दिल.
मला certificate देऊन काका बाहेर निघाले.
"काका घरी जाताय का?"
"हो. ड्युटी संपली."
"चला मी सोडतो घरी."
"अहो असुद्या, तुमच घर उलट्या बाजूला आहे. तुम्हाला लांब पडल. मी जातो कि चालत."
"चला हो."माझ्या वाचलेल्या त्रासाच्या बदल्यात त्यांना घरी सोडण काहीच नव्हत.

रस्त्यात त्यांना सहज विचारलं, "काका तुम्ही पैसे का नाही घेत हो?"
मनापासून हसून काका म्हणाले, "हा हा हा, अहो सरकार पगार देतो की..."
याच तर मला पण हसू आल. "अहो सरकार सगळ्यांनाच पगार देतो. तरी सगळेजण वरून पैसे मागून घेतात की."
"तशी आता सवय झालीये सगळ्यांना. काय करणार त्याला?"
"मग तुम्हाला का नाही लागली हि सवय?"
"अहो मला जो पगार मिळतो त्यात मी भागवून घेतो. आम्हा म्हातारा म्हातारी ला लागत तरी किती? गरजा कमी केल्या कि खर्च पण कमी होतोच ना.
बाकी साहेबाना जायला यायला गाडी पाहिजे. चालत येण त्यांना शोभत नाही. पेट्रोल चा खर्च आला. मुलाला इंग्रजी शाळेत घालायचं, का तर सगळ्या मोठ्या लोकांचे मुलं तिथेच जातात म्हणजे मोठी फी आली.
हातात भारी मोबाईल फोन पाहिजे. कपडे दिसायला भारी पाहिजेत. मुलांना खेळाच्या क्लब मध्ये टाकायचं. त्यांना भारीतले TV चे खेळ आणून द्यायचे. अजून बराच काही असत. मला इतकाच माहित आहे."
smile देत काका म्हणाले.

२ मिनिट मला कळलच नाही कि काका खरच माहित नाही म्हणून smile देत होते कि तुमच्या श्रीमंताचे किती चोचले म्हणून हसत होते....

"आता हे इतक करायचं तर मग पैसे आणायचे कुठून?
परवा एक साहेबांचा मुलगा आला होता ऑफिस मध्ये. कोणतातरी मोठा खेळ पाहिजे म्हणून तिथेच मोठ्यांनी रडत बसला. बिचारा बाप तरी काय करणार? मुलाच्या हट्टापुढे काय चालणार?? सरकारी पगारात कुठे येत का हे सगळ?"

"मोठ्या साहेबांच्या मिसेस ना कुठेही जायचं असेल तर कार पाहिजे म्हणे. बस लागते त्यांना. का साहेब, आज ST इतकं सुधारलाय पण हे नाहीच जाणार. मग कार च्या पेट्रोल ला पैसे कुठून आणायचे?
म्हणून मग तुमच्यासारख्या लोकांच्या खिशावर संक्रात येते.
तुमचा पगार किती हो?" काकांनी एकदम track बदलला.
"४००००" (एका ३ वर्ष अनुभवी software engineer साठी नॉर्मल असलेला पगार.)
"आमच्या मोठ्या साहेबांचा पगार किती आहे माहित आहे? २5 वर्ष झाली त्यांना"
इतकी वर्षे काम करणाऱ्या माणसाचा साधारण पगार किती असावा हा अंदाज मला काही करता येईना.
काकाच पुढे म्हणाले, "४५०००"
"काय? आमच्याकडे त्यांना कमीत कमी लाख दीडलाख मिळाले असते." मी.
"तुम्हीच सांगा त्यांना काय वाटत असेल? तुमच्यासारखा मुलगा त्यांच्यापेक्षा जास्त कमावतोय.
आणि त्यांनी दिवसभर कितीही काम केल तरी पगार तितकाच. बढती मिळेल कधी माहित नाही. पगार वाढेल कधी माहित नाही. वाढला तरी सरकार हातात देणार कधी माहित नाही. पण त्यांना राहाव तर उच्च दर्जाच्या लोकांसारख लागत. कारण मोठे साहेब आहेत.
४ खोल्यांच्या घराला, ४ चाकी गाडीला कसा पुरायचा हा पगार तुम्हीच सांगा."
पुढे काका असेच काही किस्से सांगत गेले.

'जगण्यापेक्षा जगण्याच्या साधनांची हाव.' हे मित्राने कधीतरी सांगितलेलं वाक्य आठवल. खरच कितीतरी गोष्टी स्टेटस ला शोभत नाही म्हणून आपण टाळतो. कितीतरी गोष्टी विनाकारण करतो.
एखाद्या junior ऑफिसर ने कार घेतली, मग साहेबाला मोठी कार घेण भाग आहे. का कारण तो कारमधून येतो आणि साहेब स्कूटर वरून हे चांगला नाही दिसत.
बिल्डिंगमधल्या एखाद्याने गाडी घेतली मग आपण का नाही घ्यायची? पेट्रोल नाही परवडत ना मग आणून उभी करू नुसती.

खरच इतकं गरजेच आहे दाखवण कि आम्ही पण भारी standard चे आहोत?
स्वतःला मोडक तोडक इंग्रजी येत असताना मुलाला इंग्रजी शाळेत टाकायचं, आणि मग घरी अभ्यास घेता येत नाही म्हणून त्याला शिकवणी लावायची. आणि वरून मार्क कमी पडले तर त्याला शिकण्यात इंटरेस्ट नाही म्हणून त्याच्याच डोक्यावर खापर फोडून मोकळं व्हायचं.
का मराठीतून मुल शिकून मोठी होऊ शकत नाहीत? आपण स्वतः अभ्यास घेऊन मुलाच्या २ शिकवण्या बंद करता आल्या तर मुलाची शक्ती, तुमचा पैसा, आणि वेळ याची बचत नाही होणार?

आज काकांनी बोलता बोलता किती तरी गोष्टी शिकवल्या होत्या, माणसांनी उगाचच अवघड करून ठेवलेलं आयुष्य दाखवलं होत.

त्यांना घरी सोडलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होत. आजचा एक चांगला दिवस पार पडल्याचं, बायका पोरांसोबत सुखाने वेळ घालवायला मिळाल्याच, आणि कदाचित एका सुशिक्षिताला ज्ञान दिल्याच.

...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...

Monday, May 31, 2010

आता तुम्हाला कसा वाटतंय?

कोणत्याही न्यूज channel वर कायम विचारला जाणारा प्रश्न.

"दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तुमचा मुलगा मारला गेला, आपल्याला कस वाटतंय?"

असा काही प्रश्न आला कि मला त्या रिपोर्टर ला फार फार मारावस वाटत. आणि मग आपण त्याला विचारायचं "आता तुम्हाला कस वाटतंय?". हे विचारायची गोष्ट नाहीये. आणि ज्या व्यक्तीने आपला कोणीतरी जवळचा माणूस गमावलाय त्याला तर नाहीच नाही. हे कोणत्याही साधारण बुद्धी असलेल्या माणसाला कळत.
आणि रिपोर्टर म्हणजे सामान्य पेक्षा जास्त बुद्धिमत्ता असलेली व्यक्ती असते. मग हे त्यांना कस नाही कळत?

त्यांना स्वतःला असा प्रश्न कधी पडला नसेल कि अश्या प्रसंगी आपल्याला कस वाटतंय? तरी पण का विचातात ते असले फालतू प्रश्न? उत्तर माझ्याकडे नव्हत. आणि माझा कोणी मित्र या क्षेत्रातला नाहीये त्यामुळे त्यांनाच विचारण हि जमल नाही.
सध्यातरी अस काही झाल कि रिपोर्टर च्या नावान ४ अपशब्द बोलायचे आणि channel बदलायचं हेच शक्य होत.

परवा पण तेच करत होतो. सोबत मित्र होता, त्याला हसू आलं??
"का हसलास?", मी.
"उगाच रे. काही नाही. तू रागावशील."
अस म्हटल्यावर कोण शांत बसणार? "आता सांगच."
"मग अश्या परिस्थितीत तो दुसर काय  बोलू शकतो?"
"काहीपण वेगळ विचारावं. पण हा काय प्रश्न आहे, तुम्हाला कस वाटतंय?"
"काहीपण म्हणजे काय? एखादा तरी दुसरा प्रश्न सांग."
"मला नाही सुचत अश्या वेळी काय बोलायचं ते."

"मग त्याच्याकडून ती अपेक्षा का? तो तर तुझ्यापेक्षा वाईट  परिस्थितीत असतो. तो तिथे सगळ्यांच्या समोर असतो. रडणारे, आक्रोश करणारे लोक तिथे असतात. तिथे तो दुसर काय बोलणार? काय आणि कस झाल हे सगळ आधीच सांगून झालेलं असत. यापेक्षा दुसरा असा कोणता प्रश्न आहे? या प्रश्नामुळे तिथल दुःख  कमी होत नाही, पण किमान वाढत तर नाही..."

"तू त्या रिपोर्टर ची बाजू घेतोयेस?", मी रागातच बोललो.
"तसं नाही, पण फक्त त्याचीच चूक आहे हे मला मान्य नाही. त्याला तसं बोलायला भाग पाडलं जात."
"कोण करेल असं?"
"आपण सगळे."
"काहीतरीच बोलू नकोस."
आणि तो एकदम फॉर्म मध्ये आला. "मग १ तास झाला उगाच channel का बदालतोयेस? काय शोधातोयेस TV वर?"
"काहीतरी चांगल, इंटरेस्टिंग."
"there you go. काहीतरी इंटरेस्टिंग असल्याशिवाय आपण channel बघतच नाही ना. काहीतरी मसाला हवा असतो. twist हवा असतो."
"अरे पण असला मसाला कोणाला हवाय?"
"नाही हवाय? मग का अजूनपर्यंत News TV का चालू आहे? त्यानी त्याच दुकान का बंद नाही केल अजून?"
"कारण काही वेडे लोक बघतात ते channel अजून."
"काही नाही, फार जास्त वेडे लोक बघतात. कारण आपल्याकडे अश्या वेड्या लोकांची कमी नाहीये." आता तर तो पण जोश मध्ये आला होता.

"अरे पण काही लोक ते time pass म्हणून बघतात." मी जरा defence मध्ये बोललो.
"अरे पण बघतातच ना. channel ला TRP मिळतोच ना. जाहिरात मिळवायला तेच लागत. आणि तोच तर मुख्य धंदा आहे. इथे बातम्या देऊन तुमच ज्ञान वाढवायला कोण समाज सेवक बसलेत काय? इथे प्रत्येकजण business करायला बसलाय. सध्या बातम्या बघायला कोणाला वेळ आहे. लोकांना कामातून वेळ मिळाला कि entertainment हवी असते. त्या बोर बातम्या ऐकून अजून डोक कोण खराब करेल?
तू कंपनी चा मार्केटिंग manager आहेस. client ला मस्का लावून, थोडा फार का ना होईना जास्तीच बोलून डील पक्की करतोसच ना?"
"अरे पण ते माझं काम आहे?"
"मग न्यूज तयार करून ती लोकांच्या गळी उतरवण हे त्याच काम आहे. त्याच त्याची चूक ती काय? त्याने ते नाही केल तर उद्या chennel त्याला लाथ मारून हाकलून देईल. मग त्याच्या पोटा-पाण्याचा काय?
आणि जर लोक नाहीच बघत अश्या बातम्या, तर सगळेच channel असली भंकसगिरी करतायेत. त्यांचा TRP का कमी नाही होत मग?"
यावर माझ्याकडे उत्तर नव्हत. आणि तो म्हणत होत ते खरपण होत.

"मला एक सांग, तू तुझ्या client ला काय देतोस?"
"जो ते मागेल तो.", मी पुढच्या वाराचा अंदाज घेऊन बोललो.
"मग channel वाला तेच करतोय तर तुम्हाला राग का येतो? तुम्ही त्याच channel बघता म्हणून तुम्ही त्याचे client झाला. बरोबर कि नाही?"
मी फक्त होकारार्थी मान डोलावली.
"मग तूच आत्ता म्हणालास ना काहीतरी इंटरेस्टिंग पाहिजे. ते त्यांनी दिल तर तू त्याला शिव्या देतोस. आपल्याकडचे बहुतांशी लोक ह्या सगळ्या बातम्या मनोरंजन म्हणून बघतात. ४ शिव्या देऊन कुठलातरी राग यांच्यावर काढतात. आणि परत तेच channel बघतात. तुम्हाला इतकाच राग येतो तर बघूच नका ना ते chennel . TRP कमी झाला कि तो आपोआप सरळ बोलेल. त्यांनी कुठे जबरदस्ती केलीये कि तुम्ही आमचा channel नाही बघितला तर तुम्हाला दंड करू म्हणून."

"मग TV वर बघायचं तरी काय?", काहीतरी बोलून विषय बदलायचा तर भलताच काहीतरी बोललो...

तो बोलला ते सगळ पटल. म्हणून TV बंद करून टाकला.

आणि मग त्यानी हळूच विचारलं, "तुम्ही तोंडावर आपटलात, आता तुम्हाला कसा वाटतंय?"
--------------------------------------------------------------------------------------------------------

वरील लेखात कोणालाही दुखावण्याचा किंवा कोणावरही कोणत्याही प्रकारचा आरोप करण्याचा हेतू नाही. कोणाला तसे काही वाटल्यास क्षमस्व. पण यातील जे चांगल वाटेल ते घ्याव आणि बाकी सोडून द्याव हि विनंती.

...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...