Friday, January 20, 2012

देवाचं ऑफिस



आपल्याकडे ऑफिस मध्ये प्रत्येक गोष्ट कागदावर लिखित स्वरूपात हवी असते. कारण उद्या कोणी काही चौकशी काढली, कोणी काही चूक केली तर लगेच आपण कागदोपत्री दाखले देऊन आपल्या डोक्यावरून दोष झटकून मोकळे. 

आणि अश्याच गरजेच्या वेळी जर तो कागदच गहाळ झाला तर??
आपलं नशीब तर असं असत, की कामं नसेपर्यंत आपण सगळ सांभाळून ठेवतो. आणि ज्या दिवशी आपण कागद / मेल फेकून देतो नेमकी दुसर्या दिवशीच त्याची गरज पडते.
आकाश पातळ एक करून आपण ते शोधायच्या मागे. आणि इतक करूनही नाही सापडला कागद की मग देवाचा धावा..

देवाची सगळी कामं जशी परफेक्ट असतात तशी आपली का होत नाहीत?

गेली कित्येक वर्षे देव संपूर्ण ब्रम्हांड अगदी व्यवस्थितपणे चालवतोय. एकही चूक नाही.
देवाचं एक बर आहे, सगळ ब्रम्हांड त्याचंच. कोणाला उत्तर द्यायचं नाही, कोणाच ऐकून घ्यायचं नाही.

पण देवाला कोणाला उत्तर द्यायचं असेल तर? त्यालाही कोणीतरी वरून order देत असेल तर? त्यालाही वर्षाअखेरीस balance sheet मध्ये नफा दाखवावा लागत असेल तर?

सगळ्या देवांचे सदा हसमुख भाव एकदम बदलतील.

देव त्याच्या क्युबिकल मध्ये. (अर्थात क्युबिकल पण मोठं असणार म्हणा) समोर भला मोठं १००" स्क्रीन. त्यावर १५००-१६०० application एकत्र चालू. आणि देव कोणत्यातरी  फाईल  मध्ये डेटा अपडेट करतोय.
पूर्ण जगातले इतके लोक, प्रत्येकाचा पाप पुण्याचा प्रत्येक मिनिटाचा हिशोब. सगळा डेटा नुसता बघूनच चक्कर यायची.
मग इतक्या मोठ्या गबाळात कुठेतरी गडबड ती व्हायचीच. एखाद वेळेस कॉम्पुटर hang होणार. मग त्याचा खाली काय असार होणार?

या सगळ्यात एखाद्या फाईल मधला डेटा चुकून डिलीट झाला की खाली त्या व्यक्तीची लगेच "याददाश्त गायब"
"मै कहा हु? मै कौन हु?" मोड मध्ये जाणार.
एखाद्या फाईल च्या प्रोग्राम मध्ये शेवटी end कमांड लिहिली आणि फाईल बंद करायची राहिली की खाली माणूस कोमा मध्ये.
वरती area manager ची टारगेट ची मीटिंग आली की लगेच खाली सुनामी, चक्री वादळ, भूकंप..
देवाने वर रेफ्रेश केल की खाली लगेच दिवस चेंज.

असं म्हणतात की ब्रम्हदेव निर्मिती करतात, विष्णू संगोपन आणि शंकर संपवतात.
दर महिन्याला विष्णुदेव शंकर देवाकडे डेटा पाठवणार.

"या महिन्यात वेळ संपलेल्यांची यादी"
शंकर देव लगेच फाईल  यमाकडे पाठवणार. तितक्यात विष्णुदेवाच्या लक्षात येणार अरे एक नाव चुकून लिहील गेलं. लगेच मेल फोन जाणार.
आणि खाली पृथ्वीवर एखादी व्यक्ती एखाद्या १०० च्या माळ्यावरून पडताना मधेच कुठेतरी अलगद अडकणार.
वर देव बिचारा आपला घाम पुसत असणार आणि आपण खाली चमत्कार म्हणून टाळ्या वाजवणार. :)

रोज रोज असा काहीतरी गोंधळ, कुठे चमत्कार, कुठे नमस्कार, या सगळ्यात कॉम्पुटर hang.
मग alt + ctrl + delete : आणि खाली कलयुग संपून दुसर युग सुरु होणार.

पण कामाच्या वेळेस देव त्याच खर काम करणार. खर्या भक्तांच्या अडचणी सोडवणार. त्यांची मदत करणार. न सांगता, न मागता.
तो अडकलेला असतो त्याच्या जवळच्या लोकांच्या  प्रश्नात. तो विचारात असतो सगळ्यांच भलं करण्यात.

आजकाल देवाच्या ऑफिस (मंदिर) पुढे भेटायला येणार्यांची गर्दी वाढतच चालली आहे. सुट्टी असेल तर मुंगीसुद्धा घाबरून आत नाही जाणार इतकी गर्दी.
लोकांमधली भक्ती वाढली की पाप धुण्याची गरज??

बहुतेक पाप धुण्याची गरज.

'प्रत्येक माणसात देव आहे' ही संकल्पनाच नाहीशी झालीये. माणुसकी दिसेनाशी झालीये.
देवाला लाख रुपये देणगी म्हणून देणारे आपण रस्त्यावरच्या गरिबाला २ रुपये पण देत नाही.
मॉल मध्ये जाऊन ७०० रुपयांची गोष्ट १००० ला घेणारे आपण ५ रुपयाच्या भाजीत 1 रुपयासाठी घासाघीस करणार.
देवाची मूर्ती १ मिनिट जास्त दिसावी म्हणून दुसर्या माणसाला धक्काबुक्की करून जाणार.

मग कसे काय आपण पुण्य कमावणार? म्हणूनच देवस्थळी गर्दी. पुण्य तर मिळत नाहीये, कमीत कमी पापाचा भरलेला घडा तरी वेळोवेळी रिकामा करून यावं, म्हणजे नव्याने पाप करायला परत मुभा. मला तर वाटत देवाने पाप पुण्याचे घडेही बदलले असतील.
पुण्यासाठी छोटा तांब्या आणि पापासाठी मोठा रांजण...

देवही बसल्या बसल्या विचार करत असेल, इतके लोक, त्यांचा इतका पाप पुण्याचा हिशोब, मागचा जन्म, पुढचा जन्म आणि अजून काय काय...
माझा तर ठाम विश्वास आहे,देव ज्याचा त्याचा हिशोब ज्या त्या जन्मताच पूर्ण करत असेल. सगळ करून बाकी नेहमी शून्य.

मग आपण त्यावर तोडगा म्हणून या देवाचा अभिषेक कर, त्या देवाचा हवन कर, इकडे देणगी दे, त्या ग्रहाची शांती कर आणि अजून बरंच काही.

मग या सगळ्याला वैतागून देव शेवटी एकच करणार.
alt + ctrl + delete
alt आणि ctrl तर बहुतेक देवाने दाबल आहे. फक्त delete बाकी आहे. बघूया आपण देवाला कधी भाग पाडतो ते.


...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...

4 comments:

  1. सहीच रे सारंग ..
    कल्पनाशक्तीच्या भराऱ्या जबराच आहेत :)

    पुण्यासाठी छोटा तांब्या आणि पापासाठी मोठा रांजण - पटले बुवा

    "alt आणि ctrl तर बहुतेक देवाने दाबल आहे. फक्त delete बाकी आहे" = हो असेच काहीतरी
    (अवांतर : तो सचिन चे महाशतक झाले की देलेते दाबणार :) )

    बाकी लेख सहीच झालाय ..

    ReplyDelete
  2. तुमचे ब्लॉग छान आहेत. www.globalmarathi.com वर पण पोस्ट करा आम्हाला तेथे वाचायला आवडतील

    ReplyDelete