Tuesday, June 1, 2010

सुशिक्षित काका

".... साल्यांना पगार काय झक मारायला देतात का? तुम्हाला तुमचा पगार पुरत नाही म्हणून आमचा खायचा का?? आमच्याकडे पैशाच झाड आहे का??"
मित्र तावातावातच घरात आला. तो ५ मिनिट अशीच तनतन करत होता.
त्याला थंड पाणी दिलं, a/c समोर बसवलं. जरा वेळाने त्याचा डोकं शांत झालं.

याच कोणत्यातरी government च्या ऑफिसमध्ये कधीतरी काम पडायचं. सवयी प्रमाणे तिथे वजन पडल्याशिवाय काम होता नाही. आणि आमच्या साहेबाना वजन ठेवणच नेमकी जमत नाही.

"अरे नुसती एक सही करायची आहे त्याला. ५ दिवस झालेत चकरा मारतोय. सगळे कागदपत्र मी जमा केले आहेत. त्याच्यावर शिक्के पण बसलेत. आता domicile वर एक शेवटची सही करायला त्याला वेळ नाहीये. दिवसभर ऑफिस मध्ये नुसता ढिम्म सारखा बसून असतो @#$@#" आणि पुढे बरच काही....

त्याला काहीही समजावण्यात त्यावेळी अर्थ नव्हता. मी शांतपणे कागदपत्र घेतले आणि दुसर्या दिवशी त्या ऑफिसमध्ये गेलो. माझे बाबा सरकारी कर्मचारी होते. त्यांच्यामुळे सरकारी कार्यालयातले काही लोक माझ्या ओळखीचे होते. म्हटलं बघाव इथे कोणी ओळखीचे दिसतंय का? तितकेच जरा ५० रुपये कमी लागतील हा विचार.

तितक्यातच एक वयस्कर शिपाई काका स्वतःहूनच स्मितहास्य करत माझ्याकडे आले. 'वाह सकाळी सकाळी एक बकरा मिळाला' या खुशीतच आले असणार.
त्यांनी एकदम चांगली ओळख असल्यासारखीच सुरुवात केली.
"काय साहेब आज इकडे कस काय?"
हे मला अनपेक्षित होत. मी ओळखलं नसल्याचे भाव कसतरी लपवत म्हणालो, "काही नाही हो काका, थोडसं काम होत."
government च्या ऑफिसमध्ये लोक काम असताना जाण्याच टाळतात, मग काम नसताना कोण कशाला मरायला  ऑफिस मध्ये जाईल?? त्यांनी माझी विकेट गेल्याच ओळखल आणि म्हणाले, "अहो तेच, काय काम काढलत?"
"मित्राच  domicile certificate हवं होत."
"कागदपत्र आणलियेत?"
"हो सगळी आहेत. सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यात. आता फक्त domicile वर सही हवी आहे."
"द्या इकड ते. साहेब दुपारी येतील. मी घेतो त्यांची सही. संध्याकाळी येऊन घेऊन जा certificate."
"धन्यवाद काका."
सवयी प्रमाणे खिशातून ५० ची नोट काढून दिली.
"अहो पैसे कशाचे साहेब?"
आता या प्रश्नाला काय उत्तर दयावं?? (तुम्हाला कोणाला सुचलं तर मला सांगा)
"पैसे नको. तुम्ही संध्याकाळी या. तुमच काम करून ठेवतो." अस म्हणत त्यांनी पैसे परत माझ्या खिशात टाकले आणि निघून गेले.

हे म्हणजे नरकात जाऊन रंभेचा डान्स बघायला मिळण्यासारख होत.
नंतर आठवल माझ्या domicile च्या वेळेस बाबांसोबत आलो असताना यांनीच माझा काम केला होता (पैसे न घेता). एक साधा सरळ आणि चांगल्या मनाचा माणूस म्हणून बाबांनी ओळख करून दिली होती. (माझा दुर्दैव कि इतक्या चांगल्या माणसाची ओळख मी विसरलो होतो.)

संध्याकाळी मी ५.३० च्या सुमारास गेलो तर काका जसे माझी वाटच बघत होते. लगेच त्यांनी मला certificate आणून दिल.
मला certificate देऊन काका बाहेर निघाले.
"काका घरी जाताय का?"
"हो. ड्युटी संपली."
"चला मी सोडतो घरी."
"अहो असुद्या, तुमच घर उलट्या बाजूला आहे. तुम्हाला लांब पडल. मी जातो कि चालत."
"चला हो."माझ्या वाचलेल्या त्रासाच्या बदल्यात त्यांना घरी सोडण काहीच नव्हत.

रस्त्यात त्यांना सहज विचारलं, "काका तुम्ही पैसे का नाही घेत हो?"
मनापासून हसून काका म्हणाले, "हा हा हा, अहो सरकार पगार देतो की..."
याच तर मला पण हसू आल. "अहो सरकार सगळ्यांनाच पगार देतो. तरी सगळेजण वरून पैसे मागून घेतात की."
"तशी आता सवय झालीये सगळ्यांना. काय करणार त्याला?"
"मग तुम्हाला का नाही लागली हि सवय?"
"अहो मला जो पगार मिळतो त्यात मी भागवून घेतो. आम्हा म्हातारा म्हातारी ला लागत तरी किती? गरजा कमी केल्या कि खर्च पण कमी होतोच ना.
बाकी साहेबाना जायला यायला गाडी पाहिजे. चालत येण त्यांना शोभत नाही. पेट्रोल चा खर्च आला. मुलाला इंग्रजी शाळेत घालायचं, का तर सगळ्या मोठ्या लोकांचे मुलं तिथेच जातात म्हणजे मोठी फी आली.
हातात भारी मोबाईल फोन पाहिजे. कपडे दिसायला भारी पाहिजेत. मुलांना खेळाच्या क्लब मध्ये टाकायचं. त्यांना भारीतले TV चे खेळ आणून द्यायचे. अजून बराच काही असत. मला इतकाच माहित आहे."
smile देत काका म्हणाले.

२ मिनिट मला कळलच नाही कि काका खरच माहित नाही म्हणून smile देत होते कि तुमच्या श्रीमंताचे किती चोचले म्हणून हसत होते....

"आता हे इतक करायचं तर मग पैसे आणायचे कुठून?
परवा एक साहेबांचा मुलगा आला होता ऑफिस मध्ये. कोणतातरी मोठा खेळ पाहिजे म्हणून तिथेच मोठ्यांनी रडत बसला. बिचारा बाप तरी काय करणार? मुलाच्या हट्टापुढे काय चालणार?? सरकारी पगारात कुठे येत का हे सगळ?"

"मोठ्या साहेबांच्या मिसेस ना कुठेही जायचं असेल तर कार पाहिजे म्हणे. बस लागते त्यांना. का साहेब, आज ST इतकं सुधारलाय पण हे नाहीच जाणार. मग कार च्या पेट्रोल ला पैसे कुठून आणायचे?
म्हणून मग तुमच्यासारख्या लोकांच्या खिशावर संक्रात येते.
तुमचा पगार किती हो?" काकांनी एकदम track बदलला.
"४००००" (एका ३ वर्ष अनुभवी software engineer साठी नॉर्मल असलेला पगार.)
"आमच्या मोठ्या साहेबांचा पगार किती आहे माहित आहे? २5 वर्ष झाली त्यांना"
इतकी वर्षे काम करणाऱ्या माणसाचा साधारण पगार किती असावा हा अंदाज मला काही करता येईना.
काकाच पुढे म्हणाले, "४५०००"
"काय? आमच्याकडे त्यांना कमीत कमी लाख दीडलाख मिळाले असते." मी.
"तुम्हीच सांगा त्यांना काय वाटत असेल? तुमच्यासारखा मुलगा त्यांच्यापेक्षा जास्त कमावतोय.
आणि त्यांनी दिवसभर कितीही काम केल तरी पगार तितकाच. बढती मिळेल कधी माहित नाही. पगार वाढेल कधी माहित नाही. वाढला तरी सरकार हातात देणार कधी माहित नाही. पण त्यांना राहाव तर उच्च दर्जाच्या लोकांसारख लागत. कारण मोठे साहेब आहेत.
४ खोल्यांच्या घराला, ४ चाकी गाडीला कसा पुरायचा हा पगार तुम्हीच सांगा."
पुढे काका असेच काही किस्से सांगत गेले.

'जगण्यापेक्षा जगण्याच्या साधनांची हाव.' हे मित्राने कधीतरी सांगितलेलं वाक्य आठवल. खरच कितीतरी गोष्टी स्टेटस ला शोभत नाही म्हणून आपण टाळतो. कितीतरी गोष्टी विनाकारण करतो.
एखाद्या junior ऑफिसर ने कार घेतली, मग साहेबाला मोठी कार घेण भाग आहे. का कारण तो कारमधून येतो आणि साहेब स्कूटर वरून हे चांगला नाही दिसत.
बिल्डिंगमधल्या एखाद्याने गाडी घेतली मग आपण का नाही घ्यायची? पेट्रोल नाही परवडत ना मग आणून उभी करू नुसती.

खरच इतकं गरजेच आहे दाखवण कि आम्ही पण भारी standard चे आहोत?
स्वतःला मोडक तोडक इंग्रजी येत असताना मुलाला इंग्रजी शाळेत टाकायचं, आणि मग घरी अभ्यास घेता येत नाही म्हणून त्याला शिकवणी लावायची. आणि वरून मार्क कमी पडले तर त्याला शिकण्यात इंटरेस्ट नाही म्हणून त्याच्याच डोक्यावर खापर फोडून मोकळं व्हायचं.
का मराठीतून मुल शिकून मोठी होऊ शकत नाहीत? आपण स्वतः अभ्यास घेऊन मुलाच्या २ शिकवण्या बंद करता आल्या तर मुलाची शक्ती, तुमचा पैसा, आणि वेळ याची बचत नाही होणार?

आज काकांनी बोलता बोलता किती तरी गोष्टी शिकवल्या होत्या, माणसांनी उगाचच अवघड करून ठेवलेलं आयुष्य दाखवलं होत.

त्यांना घरी सोडलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होत. आजचा एक चांगला दिवस पार पडल्याचं, बायका पोरांसोबत सुखाने वेळ घालवायला मिळाल्याच, आणि कदाचित एका सुशिक्षिताला ज्ञान दिल्याच.

...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...

1 comment:

  1. जगण्यापेक्षा जगण्याच्या साधनांची हाव....

    ReplyDelete