Tuesday, July 20, 2010

मराठी पाउल पडते पुढे....

मे महिन्यात महाराष्ट्राने सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले. संयुक्त महाराष्ट्राला ५० वर्षे झाली. महाराष्ट्रासाठी फार महत्वाचा दिवस होता १ मे २०१०.
सगळीकडेच महाराष्ट्राने केलेली प्रगती, सुधारणा आणि अजून बऱ्याच चांगल्या गोष्टींची माहिती वाचायला मिळत होती.
दर महिन्याला महाराष्ट्र सरकार तर्फे एक मासिक काढण्यात येतं. त्यात संयुक्त महाराष्ट्राचा लढा, त्यातील सगळ्या लोकांचा सहभाग, विविध खेत्रातील लोकांनी केलेली कामगिरी अशी सगळी माहिती होती.

हे सगळं वाचताना फार आनंद झाला. आपण या भूमीत जन्माला आल्याचा अभिमान वाटला.
मनात विचार सुरु झाला. अजून आपण काय काय काय शकतो, महाराष्ट्राला अजून पुढे कसं जाता येईल?

आणि एकापुढे एक समस्या दिसत गेल्या. आणि समस्या गंभीर होत्या.
आज आपल्याकडे पुरेशी वीज नाही, पिण्यासाठी-शेतीसाठी पुरेसे पाणी नाही, शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी आपल्याकडे उत्तर नाही, दर वर्षी पदवी उत्तीर्ण होणाऱ्या मुलाच्या संख्येइतक्या नोकऱ्या नाहीत, आणि अजून बरेच काही.

माझ्या आधीच्या लेखात मे म्हटले आहे, प्रत्येक सुधारणेसाठी वेळ लागतो. पण ५० वर्षे हा वेळ फार जास्त आहे. ५० वर्षात आपण आपल्या गरजांसाठी पर्याय शोधू नाही शकत?

आपल्यात ती क्षमता नाही असे तर मुळीच नाही. क्षमता आहे म्हणून आज आपण इथे उभे आहोत.
संत ज्ञानेश्वर, शिवाजी महाराज यांसारख्या अनेक मोठ्या व्यक्तींनी महाराष्ट्राला घडवलं आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मुंबई, पुणे अग्रेसर आहेत, गावं तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एस. टी. महाराष्ट्रात आहे, भारताची आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्रात आहे, भारताच्या एकूण उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा भरपूर आहे.

तरीपण आपण अजून बरीच प्रगती करू शकलो असतो असे मला वाटते. पण त्याला लागणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राजकीय इच्छाशक्ती आपल्याकडे नाही.

गेली कित्येक वर्षे निवडणुका पाणी, महागाई, रस्ते आणि वीज याच मुद्यांवर लढवल्या जातात. ५० वर्षात हे मुद्द्यांचा निकाल का लागत नाही?
सगळ्यात सोप्पा कारण, 'जर हे मुद्देच संपले तर मग निवडणुका लढवायच्या कश्याच्या जोरावर? विरोधी पक्षाला कमी लेखायचं कोणत्या मुद्यावर? आणि त्याहूनही महत्वाचं हे काम करायची जबाबदारी टाकायची कोणाच्या डोक्यावर?'
काम करायला कोणीच तयार नाही. सगळ्यांना फक्त या योजनातून येणाऱ्या पैश्यातून आपला हिस्सा कसा काढायचा ह्याचीच चिंता आहे.

"आम्ही जनतेसाठी बराच काही करू इच्छितो. या निवडणुकीत आम्हाला निवडून द्या. सत्ता आमच्याकडे आली की कोणालाही कसलीही उणीव भासणार नाही."
मला एक काळात नाही जनतेसाठी काम करायला सत्तेत का असावं लागतं? विनाकारण पैशाची जी उधळण सगळेजण करतात ते पैसे जनतेसाठी वापरत का नाही?

एखाद्या नेत्याचा वाढदिवस असेल तर पूर्ण महाराष्ट्र भर अभिनंदनाचे फलक लागतात. लाखो रुपये खर्च केले जातात. ते पैसे जनतेसाठी का नाही वापरत? महापालिकेने रस्ता दुरुस्त नाही केला तर तिथे सत्यनारायणाची पूजा मांडण्यापेक्षा हे पैसे वापरून रस्ता दुरुस्त करावा. जनतेची सेवा करायची आहे तर मग हे का सुचत नाही.

सगळे बडे नेते दर वेळेस एखाद्या गरीब कुटुंबाला भेट देतात. त्यांच्यासोबत त्यांच काम करतात. कोणी VIP ऐवजी सध्या डब्यातून प्रवास करतात. पण आजपर्यंत एकही नेत्याने कधी म्हटलं नाही, 'माझ्या वाढदिवसाचे फलक लावण्यापेक्षा तो पैसा जनतेसाठी वापरा.' जर तुम्ही लोकांचे आवडते असाल तर लोक तुमचा वाढदिवस लक्षात ठेवतीलच. त्यासाठी जाहिरात का?

असे फलक लावून फक्त हेच सिद्ध होत कि तुमचा नेता जनतेमध्ये फार प्रिया नाही आणि म्हणूनच तुम्हाला त्यांची जाहिरात करून त्यांना लोकांपर्यंत पोहोचवाव लागतंय.
महात्मा गांधी, अब्दुल कलाम अश्या मोठ्या व्यक्तींनी कुठे फलक लावलेले सांगणारा आपल्याला भेटणार नाही. पण तरीही देशभरात लोक त्यांची पूजा करतात. कारण एकाच होता कि त्यांनी काम केलं. आजकाल काम होत नाही म्हणून जाहिरात.

असो विषयांतर होत जातंय.
महाराष्ट्राला अजून पुढे नेणं हि प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाची जबाबदारी आहे. कर्तव्य आहे. मग तो सामान्य माणूस असो किंवा कुणी मोठी व्यक्ती. पण दुर्दैवाने आज आपण फक्त हक्कांबाबत बोलतो. कर्तव्यांबाबत कधीच नाही.
ठरवलं तर सामान्य माणूस काहीही करू शकतो. हे ५ जुलै च्या बंद ने सिद्ध करून दाखवलं. मग असाच काहीतरी या इच्छा शक्ती गमावून बसलेल्या राजकीय शक्तींविरुद्ध का करू नये? मतदानात सगळ्याच पक्षांना बाद का ठरवू नये?

पण हे करायला पण इच्छा शक्ती हवी आहे. आणि ती आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे नाही. त्यासाठी त्यांना दोष देत नाही. कारण सामान्य माणसाला पहिले घराचा विचार करावा लागतो, आपल्या भविष्याचा विचार करावा लागतो, मुलांचा विचार करावा लागतो. आणि या सगळ्या ओढाताणीतच दिवस संपून जातो.

आपण सध्याच्या परीस्थित खुश आहोत. महाराष्ट्र इतर राज्यांशी तुलना करता बऱ्याच गोष्टीत पहिल्या ५ मध्ये आहे.
आपल्या इथे रोजगार, दळणवळण, ओद्योगिक विकास, शेती यासाठी बऱ्याच सुविधा आहेत. आणि राज्य प्रगतीपथावर आहे. या आश्वासनांवरच आपण समाधानी आहोत. आपण इतर बऱ्याच जणांपेक्षा चांगले आहोत.

पण आपल्यापेक्षाही इतर काही जण अजून चांगले आहे आणि आपल्या बऱ्याच पुढे आहेत याकडे आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो.
तुलना करायची तर आपल्यापेक्षा पुढे असलेल्याशी करावी. त्याच्यासारखं कसं होता येईल हा विचार करावा. पण मग त्यासाठी परत कष्ट कोण घेणार?
सरकार? सामान्य जनता? समाज सुधारक?

यापैकी कोणीच तयार होत नाही.
'प्रयत्नांती परमेश्वर' म्हणण्या पेक्षा आपण सगळेच 'असेल हरी तर देईल खाटल्यावरी' चा जप करतोय.
आपणच इच्छा शक्ती गमावून बसलोय तर मग इतरांना काय दोष द्यायचा.
आपण काय करायचं हे मी सांगणार नाही, पण प्रत्येकांनी करायचं ठरवलं तर मार्ग आपोआपच सापडेल.

'शिवाजी जन्मावा, पण शेजारच्याच्या घरात' हि म्हण रूढ झाली यातच सगळ काही आलं....

...आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनवणार...

3 comments:

  1. Good article!! I agree with u....everyone has to take equal efforts to make some improvements and make a change....
    Hope everyone of us tries to make an effort for a change.......

    ReplyDelete